कोल्हापूर : जगण्याने छळले होते! नैराश्यातून त्यांनी संपविले जीवन | पुढारी

कोल्हापूर : जगण्याने छळले होते! नैराश्यातून त्यांनी संपविले जीवन

कोल्हापूर, दिलीप भिसे : दिवसागणीक घडणार्‍या आत्महत्यांच्या घटनांमुळे चिंतेचे सावट आहे. समाजात अस्वस्थता आहे. कौटुंबिक वाद, आर्थिक कारणासह अन्य क्षुल्लक कारणांतूनही गळफास अन् कीटकनाशक प्राशन करून मृत्यूला कवटाळण्याचे प्रमाण वाढले आहे. दि. 1 ते 31 मे या काळात शहर, जिल्ह्यात 38 जणांनी स्वत:ची जीवनयात्रा संपविली आहे. कीटकनाशक प्राशन करून 271 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. काळीज धस्स करणार्‍या या घटनांमुळे समाजातील सर्वच घटकांची घालमेल वाढू लागली आहे.

नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविणार्‍या घटकांमध्ये 17 वर्षीय शाळकरी मुले- मुली, कॉलेज तरुणी, नवविवाहिता, औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसह वयोवृद्ध, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजुरांचाही समावेश आहे. ग्रामीणपट्ट्यात अगदी क्षुल्लक कारणांतूनही कीटकनाशक प्राशन करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. रोज सरासरी 8 ते 10 अत्यवस्थ स्थितीतील रुग्ण शासकीय, खासगी रुग्णालयांत दाखल होत आहेत. ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत आहे.

आत्महत्यांच्या ठळक घटना

अल्पभूधारक शेतकरी महादेव दत्तू पाटील (दोनवडे, ता. करवीर), अवधूत अजित डाकवे (कळंबा), रंगराव बाजीराव देशमुख (हणमंतवाडी, ता. कागल), रामचंद्र शामराव बुधगावकर (शेतकरी, कोडोली), केबल व्यावसायिक संजय मधुकर गायकवाड (शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर), राम ऊर्फ कपिल बाजीराव सोमवंशी (पांजर पोळ, शाहू मिल चाळ), उत्तम शामराव चव्हाण (कामगार, उचगाव, ता. करवीर), चांदी कारागीर अनिल वसंत राऊत (शिंगणापूर), देवदत्त रंगराव कांबळे (कामगार, गोकुळ शिरगाव), सचिन अरुण कांबळे (सेंट्रिंग कामगार, पाचगाव, ता. करवीर), आकाश राजेंद्र सिंघन (फळ विक्रेता, बांबवडे, ता. शाहूवाडी) यांचा आत्महत्या केलेल्यांत समावेश आहे.

परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मनालीने उचलले टोकाचे पाऊल!

हलकर्णी (ता. चंदगड) येथील मनाली मधुकर सावंत… बारावीत शिक्षण घेत असलेली विद्यार्थींनी… 18 वर्षीय मनालीचे भविष्यातील स्वप्नही मोठे होते… बारावी परिक्षेत चांगले गुण मिळाल्यास नोकरीची चांगली संधी मिळेल,अशी तिची अपेक्षा… परिक्षेचा निकाल जाहीर झाला… मनालीला अपेक्षा पेक्षा कमी मार्क मिळाल्याने तिने नैराश्येतून आठ दिवसापुर्वी हलकर्णीत राहत्या घरी आत्महत्या केली. मनालीने टोकाची भुमिका घेतली.मनाला चटका लावणार्‍या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

लग्नानंतर अवघ्या 15 दिवसात नवविवाहितेने मृत्यूला कवटाळले

गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील प्रभावळे कुटुंबियांसह गोतावळा लग्न सोहळ्यामुळे सुखावला होता.लग्न सोहळ्यामुळे सार्‍याचीच दोन- तीन आठवडे धांदल उडाली होती. लग्नाला जेमतेम पंधरा दिवस झाले असतील. घरातील धार्मिक विधी आटोपून पै- पाहुण्यांसह नातेवाईक मंडळी आपापल्या गावाकडे परतले होते. शुक्रवारी ( दि. 19 मे) घरात कोणीही नसताना नवविवाहितेने राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेमुळे दोन्हीकडील कुटुंबांना जबर धक्क्याला सामोरे जावे लागले.

चंदगडला थरारनाट्य… बापाला खल्लास करून मुलाची आत्महत्या

चंदगड येथील देसाई वसाहतीत सोमवार दि.15 मे रोजी बाप- लेकाच्या नात्याला काळीमा फासणार्‍या घटनेमुळे जिल्हा हादरला. या संघर्षाने गावडे कुटुंबियाचं भरलं घर काही क्षणात उध्वस्त झाले. मनोहर गावडे व सागर गावडे बाप-लेकामध्ये किरकोळ कारणातून उदभवलेला वाद वाद टोकाला गेला. यादिवशी नातेवाईकांच्या घरात कौटुंबिक कार्यक्रमाची धामधूम सुरू असतानाच इकडे पुत्राने धारदार हल्ला करून जन्मदात्या बापाला खल्लास केले अन स्वत: गळफास घेवून जीवनाचा शेवट करून घेतला. घटनेपुर्वी सागरने आईशी संपर्क साधला म तुझ्या नवर्‍याला संपवितो आणि स्वत:चेही बरेवाईट करून घेतो, असे सुनावले. त्यानंतर काही क्षणात थरारनाट्य घडले… सागरने टोकाचे पाऊल का उचलले, हे गुढ अद्यापही गुलदस्त्यात राहिले आहे.

स्वत:ला श्रद्धांजली वाहून तरुणाने जीवनयात्रा संपविली!

गुरुवार, दि. 4 मे रोजी मंगळवार पेठ येथील अवधूत अजित डाकवे (वय 24) याने स्टेटसवर स्वत:ला श्रद्धांजली वाहून कळंबा (ता. करवीर) येथील भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. अवघूत लहान असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. आईने मोलमजुरी करीत मुलाला वाढविले. नवीन घराचे बांधकाम करून त्याच्या लग्नाचा विचार आईच्या डोक्यात घोळत होता. निदान वृद्धापकाळ सून, नातवंडांत जाईल, या आशेवर असलेल्या मातेवर दु:खाचा डोगरच कोसळला!

Back to top button