अकरावीसाठी 14 जूनपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया | पुढारी

अकरावीसाठी 14 जूनपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीसाठीची प्रत्यक्ष केंद्रीय प्रवेश प्रक्रिया दहावीचे गुणपत्रक मिळाल्यावर दि. 14 पासून सुरू होणार आहे. यासंदर्भातील प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी 28 कनिष्ठ महाविद्यालयांत वाणिज्य (इंग्रजी माध्यम) 1,600 आणि विज्ञान 5 हजार 880 अशा एकूण 7 हजार 480 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. वाणिज्य (इंग्रजी) आणि विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने भाग-1 व भाग-2 भरून साधारणत: 4 ते 5 फेर्‍यांमध्ये करण्याचे निश्चित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात भाग-1 साठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. आजअखेर सुमारे 800 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

विद्यार्थ्यांना दहावीचे मूळ गुणपत्रक प्राप्त झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुसार 14 ते 18 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना भाग-2 साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी मुख्य केंद्र कमला कॉलेज येथे प्रत्यक्ष जाऊन भाग-2 साठी अर्ज भरता येणार आहे. दि. 19 ते 22 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्जांची छाननी होऊन निवड यादी तयार केली जाईल. त्यानंतर दि. 23 रोजी www.dydekop.org या संकेतस्थळावर सकाळी 11 वाजता निवड यादी प्रसिद्ध होईल. 23 ते 28 जूनदरम्यान निवड यादीतील विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करता येणार आहे. केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये कला आणि वाणिज्य (मराठी माध्यम) शाखेचा समावेश केलेला नाही. या शाखांचे प्रवेश महाविद्यालयस्तरावर आरक्षण व गुणवत्तेनुसार होतील, अशी माहिती शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी दिली.

तक्रार निवारणासाठी दोन दिवस

अकरावी प्रवेशांतर्गत गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाबाबतच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी 23 व 24 जून दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार करणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने आलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नसल्याचे शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button