

कोल्हापूर, डॅनियल काळे : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अनेक अडचणींचा सामना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना करावा लागत आहे. सध्या येथे असणारी अपघात विभागाची इमारत धोकायक स्थितीत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. या इमारतीचा धोकादायक भाग केव्हा, कोणाच्या अंगावर पडेल, याचा भरोसा नाही. ना देखभाल, ना दुरुस्ती झाल्याचा फटका आता इमारतीला बसण्याची शक्यता आहे. गेल्या 20 वर्षांत सीपीआरकडे ना लोकप्रतिनिधी, ना प्रशासनाने लक्ष दिले. त्यामुळे ही अवस्था झाली आहे.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हे जिल्हा रुग्णालय असले, तरी बाजूच्या सांगली, बेळगाव आणि कोकणातील रुग्णांचेही येथे उपचाराला दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. दररोज एक हजारहून अधिक लोक येथे बाह्यरुग्ण विभागात उपचाराला येतात. मारामारी, हल्ले, अपघात, साप चावणे, विष पिणे, गव्याने धडक देणे आदी कारणांमुळे अपघात विभागात 24 तास रुग्ण येत असतात. त्यामुळे अपघात विभागाला नवी विस्तारित इमारत असणे ही काळाची गरज तर आहेच; पण आहे ती इमारतदेखील देखभाल आणि दुरुस्ती करून नीटनेटकी ठेवणे हे सीपीआर प्रशासनाचे कर्तव्य आहे.
सध्या अपघात विभागाच्या इमारतीवर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत व अन्य काही झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे दिवसागणीक ही इमारत अधिकच कमकुवत होत चालली आहे. कधी तरी या इमारतीचा धोकादायक भाग कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे व्हायला हवे.
38 कोटींचा प्रस्ताव केव्हा मंजूर होणार?
सीपीआरमधील बहुतांशी इमारती जुन्या आहेत. कित्येक वर्षे त्यांची देखभालदेखील झालेली नाही. त्यामुळे अनेक इमारती गळक्या आहेत. जीर्ण झाल्या आहेत. यापैकीच अपघात विभागाची इमारत आहे. येथेही अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे 38 कोटी रुपयांचा प्रस्ताव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून हा प्रस्ताव प्रलंबितच आहे. या प्रस्तावात अपघात विभाग आणि ओपीडी विभागाच्या दुरुस्ती आणि देखभालीचा समावेश आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्याशिवाय या विभागाची देखभाल-दुरुस्ती होणार नाही. यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.