

कोल्हापूर येथील डॉक्टर अनिल कृष्णराव शिंदे यांचे शुक्रवारी सायंकाळी अंतरंग हॉस्पिटल येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ते मेहुणे तसेच मुंबईचे शिवसेनेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांचे ते मोठे बंधू होत. दै. 'पुढारी'चे संस्थापक-संपादक डॉ. ग. गो. जाधव यांचे ते ज्येष्ठ जावई होत.
स्वातंत्र्यपूर्व काळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता कृष्णराव शिंदे यांचे ते चिरंजीव. कृष्णराव शिंदे यांना सहा अपत्ये. त्यातील अनिल हे दुसरे. शरद, शिशिर, अरविंद, सतीश हे बंधू आणि कुमुद व अक्का या दोन बहिणी. डॉ. अनिल शिंदे यांनी गुलबर्गा येथून एम.बी.बी.एस.ची पदवी प्राप्त केली आणि ठाण्याला दवाखाना सुरू केला. त्याचबरोबर पोयशा, मुकुंद आणि इंडाल या उद्योग संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ते कोल्हापुरात स्थायिक झाले.
दै. 'पुढारी'चे संपादकीय सल्लागार म्हणून त्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ काम केले. प्रकाशित होणारी इतर वृत्तपत्रे आणि 'पुढारी' यांचे रोजच्या रोज वाचन करून मूल्यमापनाचे काम ते करीत असत. आपल्या आनंदाचा भाग म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यांचे वाचन अफाट होते. त्यांना इतिहासाचा व्यासंग होता. 'पुढारी'च्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके त्यांनी वाचली होती आणि शिवाजी विद्यापीठातील अनेक पुस्तके आणून त्यांचेही वाचन ते करीत असत. त्यांना जुन्या चित्रपट संगीताची आणि शास्त्रीय संगीताचीही अत्यंत आवड होती.त्यांचा मित्र परिवारही मोठा आहे.
डॉ. अनिल शिंदे यांच्या मागे पत्नी गीता, मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर अमर (अटलांटा, अमेरिका) आणि पॉलिमर इंजिनिअर अजय (कोल्हापूर), सुना, भाऊ, बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ताराबाई पार्क येथील डॉ. यशवंतराव थोरात यांच्या बंगल्याशेजारी असलेल्या हिंदनगरमधील बंगल्यामध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले. तेथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
रक्षाविसर्जन शनिवारी, दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.