दसर्‍यापूर्वी कोल्हापूरच्या विमानतळ इमारतीचे लोकार्पण | पुढारी

दसर्‍यापूर्वी कोल्हापूरच्या विमानतळ इमारतीचे लोकार्पण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळाच्या इमारतीचे दसर्‍यापूर्वी लोकार्पण केले जाईल, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यानी शनिवारी सांगितले. दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या शिंदे यांनी विमानतळ इमारतीच्या कामाची पाहणी केली. कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन विमानतळावर होईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विमानतळाच्या विकासासाठी 256 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून सुमारे 40 हजार चौरस फुटांच्या विमानतळ इमारतीचे काम पूर्ण होत आहे. येत्या दसर्‍यापूर्वी ही इमारत वापरासाठी खुली केली जाईल. कोल्हापुरातून सध्या हैदराबाद, बंगळूर, तिरुपती, मुंबई अशी कनेक्टिव्हिटी आहे. ती आणखी वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

विमानतळावरच कोल्हापूर दर्शन

कोल्हापूरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मोठा वारसा आहे. कोल्हापूरची सर्वच क्षेत्रातील वैशिष्ट्ये प्रवाशांना पाहता येईल, त्यानुसार विमानतळ इमारतीत विविध जागा निश्चित करा, प्रत्येक भिंतीवर त्याची डिझाईन करा, त्यातून कोल्हापूरचे महत्त्व अधोरेखित झाले पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले. इमारतीत व्हिडिओ वॉल उभारण्यात येणार असून त्याद्वारेही कोल्हापूरचे दर्शन घडवले जाणार आहे.

हा आमचाच, जोतिबा डोंगरावरचा दगड

इमारतीच्या दर्शनी भागाला कमानीद्वारे ऐतिहासिक लूक दिला जाणार आहे. त्यावर मशाली लावण्याची सूचना शिंदे यांनी केली. दर्शनी भागासाठी वापरण्यात येणारा दगडही त्यांनी स्वत: निश्चित केला. मराठा साम्राज्याची, पराक्रमाची साक्ष देणारा हा काळा दगड असल्याचे त्यांनी सांगितले. निवडलेला दगड जोतिबा डोंगर परिसरातील असल्याचे सांगताच हा तर मग आमचाच, जोतिबा डोंगरावरचाच दगड असल्याचे शिंदे म्हणाले. यावेळी छत्रपती राजाराम महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेची त्यांनी पाहणी केली.

खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंग, भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार अमल महाडिक व सुरेश हाळवणकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे मुख्यालयाचे महाव्यवस्थापक रमेश कुमार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विमानतळ व्यवस्थापक अनिल शिंदे, प्रकल्प प्रमुख प्रशांत वैद्य उपस्थित होते.

Back to top button