कोल्हापूर : तलवार हल्लेखोरांच्या शोधासाठी गगनबावड्यात कोम्बिंग ऑपरेशन | पुढारी

कोल्हापूर : तलवार हल्लेखोरांच्या शोधासाठी गगनबावड्यात कोम्बिंग ऑपरेशन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा  : निवृत्ती चौक शिवाजी पेठ तलवार हल्ल्यातील संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी गगनबावडा आणि परिसरात बुधवारी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन केले. मात्र पोलिस पोहोचताच संशयित लपून बसायचे. पोलिस आणि संशयित यांच्यात रात्रभर हा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. पावसानेही या ऑपरेशनमध्ये अडथळे आणले. संशयित लवकरच पोलिसांंच्या ताब्यात असतील, असे पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी सांगितले.
दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश बबन बोडके याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.
निवृत्ती चौकात बुधवारी भरदुपारी प्रकाश बोडके (24) या तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात प्रकाश हा गंभीर जखमी झाला आहे. त्याचा हात तुटला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरुन युवराज शेळके, कृष्णात बोडेकर, केदार घुर्के, करण शेळके,राहूल हेगडे, राजू बोडके, विकास ऊर्फ चिक्या व अन्य तीन अनोळखींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शोधासाठी चार पोलिस पथके तैनात केली आहेत.
बुधवारी रात्री उशिरापर्यंत गगनबावड्याच्या जंगलात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. संशयित जेथे जेथे जात होते तेथे तेथे पोलिस पोहोचत होते. टॉर्च घेऊन पोलिस त्यांचा अंधारातही शोध घेत होते. हे सर्व संशयित एकत्रच आहेत. मात्र पावसामुळे शोधमोहिमेत अडथळे आलेे. पुन्हा ही मोहीम सुरु करण्यात आली.

Back to top button