कोल्हापूर : ‘हुमणी’ने पोखरला जिल्हा; 550 गावात प्रादुर्भाव | पुढारी

कोल्हापूर : ‘हुमणी’ने पोखरला जिल्हा; 550 गावात प्रादुर्भाव

कोल्हापूर, डी. बी. व्हाण : कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 550 गावांमध्ये हुमणी किडीने धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. सुप्त पद्धतीने जमिनीत राहून उसापासून सर्वच पिकांच्या मुळावर घाव घालण्याचे काम या हुमणीकडून होत आहे. गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड या तीन तालुक्यांतील याचा प्रादुर्भाव मोठा आहे. पाच ते आठ फुटांवर आलेल्या उसाला हुमणी लागल्याने त्याच्या वाढीवर परिणाम होत आहे. यासाठी जिल्हा कृषी विभाग प्रकाश सापळ्यांचे प्रात्यक्षिक दाखवून त्यातून बाजूला होण्याचे प्रकार सुरू आहेत. पण प्रकाश सापळ्याच्या मात्रेवर ही कीड कमी होण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी हतबल होत असून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

मे-जून महिन्यात हुमणीचे किडे बाहेर पडतात. हे किडे रात्रीच्यावेळी बाहेर पडतात. दिवसा जमिनीत जाऊन बसतात. ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका पिकांची मुळे तोडतात. त्यामुळे ऊस पीक सुकण्यास सुरू होते. यामुळे उसाची वाढ खुंटते.

हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने शेतात प्रकाश सापळे लावण्याचे नियोजन केले आहे. हे प्रकाश सापळे लावण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात 1575 ठिकाणी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय दिवेकर यांनी दिली आहे. पण किती शेतकर्‍यांनी हे प्रकाश सापळे लावले, रात्रीच्यावेळी हे सापळे लावयाचे असल्याने ते किती काळ टिकले, त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव किती कमी झाला, याची माहिती मात्र सांगितला जात नाही. फक्त प्रात्यक्षिक दाखवायचे आणि पुढील कार्यवाही शेतकर्‍यांवर सोडून देत, कृषी अधिकारी नामानिराळे होत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. यामुळे प्रकाश सापळे लावण्याची मोहीम नेटाने राबविण्याची गरज आहे.

हुमणीचा प्रादुर्भाव हा ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका या पिकांवर अधिक प्रमाणात आढळतो, या हुमणीमुळे नुकसानाची तीव्रता 30 ते 80 टक्केपर्यंत आहे.

Back to top button