कोल्हापूर : फुटबॉल विकासाऐवजी ईर्ष्येवर अनावश्यक खर्च

कोल्हापूर : फुटबॉल विकासाऐवजी ईर्ष्येवर अनावश्यक खर्च

Published on

कोल्हापूर, सागर यादव : प्रचंड हुल्लडबाजीसह 'सर्वांचे वडील…, सर्वांचा बा…, पेठेची पेठ… एकच वार…' या व अशा घोषणांसह नाहक ईर्ष्या निर्माण करणारे सोशल मीडियावरील मेसेज- व्हिडीओ, नियमबाह्य मिरवणुका, कानठळ्या बसविणारी साऊंड सिस्टीम, कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे प्रकार अशामध्येच कोल्हापूरचा फुटबॉल गुरफटला आहे. यामुळे फुटबॉल खेळाच्या विकासाऐवजी पेठांमधील नाहक ईर्ष्येवर लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च होत असल्याचे वास्तव आहे.

शतकी परंपरा लाभलेल्या फुटबॉलच्या विकासासाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) ही शिखर संस्था सक्रिय आहे. चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष मालोजीराजे, विफाच्या अध्यक्षा मधुरिमाराजे व त्यांचे सहकारी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असो. या व अशा संस्थांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या फुटबॉलला विविध योजनांचे पाठबळ देण्यासाठी सातत्याने परिश्रम घेत आहेत. या गोष्टींना भक्कम पाठबळ द्यायचे सोडून पेठा-पेठांतील तालीम संस्था व तरुण मंडळे हुल्लडबाज टोळक्यांचे लाड पुरवत आहेत.

ईर्ष्येमुळे परदेशी खेळाडूंवर लाखोंचा खर्च केला जातो. इतकेच नव्हे तर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून परदेशी खेळाडूंकडूनच बक्षिसांची लयलूट केली जाते. स्थानिक खेळाडू तालमीसाठी खेळण्याकरिता आलेल्या नोकरी किंवा व्यावसायिक संघांकडून खेळायच्या संधी वाया घालवतात. टोकाच्या इर्ष्येमुळे अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते.

फुटबॉलमध्ये करिअरच्या अनेक संधी

शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमाची ओळख जगभर आहे. सॉकर सिटी म्हणून नावारूपाला येत असलेल्या कोल्हापुरात फुटबॉल विकासासाठी अनेक संधी आहेत. याच बरोबर फुटबॉल खेळाडूंना करिअरसाठीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. वर्षभर सुरू राहणार्‍या फुटबॉल हंगामात कोट्यवधीची उलाढाल होते.

पोलिसांना अनावश्यक काम

विविध कामांमध्ये अखंड गुंतलेल्या पोलिसांवर खेळाच्या मैदानावरील अनावश्यक गोष्टी रोखण्याचा अधिकचा भार पडतो. प्रत्येक स्पर्धेनंतर विजयी संघाकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या मिरवणुका काढल्या जातात. यासाठी डॉल्बी, आतषबाजी यावर लाखो रुपयांचा खर्च केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news