कोल्हापूर, राजेंद्र जोशी : वाढत्या प्रदूषणाच्या धोक्यामुळे डिझेल वापराच्या गाड्यांची निर्मिती बंद करण्याचे धोरण एका बाजूला अवलंबले जात असतानाच भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशनने प्रदूषण रक्षणाच्या क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर कर्तृत्वाचा एक नवा झेंडा रोवला आहे. शासन अंगीकृत उपक्रमाच्या संशोधकांच्या एका पथकाने आता पेट्रोलपाठोपाठ डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे एक नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे डिझेल वापराच्या गाड्यांपासून प्रदूषणाची पातळी कमालीची घटण्यास मदत होणार आहे. याखेरीज भारताने या क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर सर्वप्रथम आपल्या तंत्रज्ञानाने विकसित राष्ट्रांनाही चकित केले आहे.
भारत पेट्रोलियमचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक जी. कृष्णकुमार यांनी नुकतीच याविषयीची घोषणा केली. या उद्योगाने आजपर्यंत आपल्या संशोधनाला जागतिक मान्यतेसाठी स्वामित्व हक्काचे (पेटंट) 164 प्रस्ताव दाखल केले आहेत. यापैकी विविध राष्ट्रांनी 87 प्रस्तावांना मान्यता दिली आहे आणि 17 उत्पादनांना व्यापारी पातळीवर आणण्याचे कामही कंपनीने केले आहे. पेट्रोलियम जगतात नवनवीन संशोधन करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रदूषणाची पातळी कमी कशी करता येईल, यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे केवळ नफा मिळवणे हा हेतू या उपक्रमाचा नाही, तर देशाला प्रदूषणापासून मुक्त करणे, हा प्रधान हेतू ठेवून भारत पेट्रोलियम कार्यरत असल्याचे जी. कृष्णकुमार यांनी म्हटले आहे.
इंधनाची क्षमता तपासणार
डिझेल इथेनॉल मिश्रणाच्या या प्रयोगात जागतिक पातळीवर पहिले पाऊल ठेवताना त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी रिफायनरी सॉफ्टवेअर व्यवसायामध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरिकेतील अॅस्पन टेक्नॉलॉजीबरोबर या संस्थेने करारही केला आहे. यासाठी के मॉडेल आणि बीपी मार्क या दोन स्वंतत्र तंत्रज्ञानाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये के मॉडेलच्या वतीने इंधनाची क्षमता तपासण्यात येईल, तर बीपी मार्कद्वारे जलदगतीने इंधनाचे रासायनिक विश्लेषणही करता येणे शक्य होणार आहे.