कोल्हापूर : हद्दवाढ झाल्याशिवाय मनपा निवडणूक नको | पुढारी

कोल्हापूर : हद्दवाढ झाल्याशिवाय मनपा निवडणूक नको

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराची तब्बल 46 वर्षे रखडलेली हद्दवाढ झाल्याशिवाय आगामी महापालिका निवडणूक घेऊ नये, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ समन्वय समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन व्यापक शिष्टमंडळातर्फे गुरुवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.

दरम्यान, प्रस्तावित गावांतील लोकांमध्ये हद्दवाढीसाठी सकारात्मकता येण्यासाठी प्रशासनाने सद्भावना आणि समन्वय यात्रा काढावी, अशी मागणी अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केली. यासाठी सहायक आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमावे, अशी मागणीही केली.

निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, कोल्हापूरची जनता 46 वर्षे हद्दवाढ मागत आहे. वेळोवेळी ठराव केलेत. राजकीय इच्छाशक्‍ती नसल्याने प्रश्‍न सुटलेला नाही. 42 गावांसह हद्दवाढ मिळावी, हद्दवाढीशिवाय मनपा निवडणूक घेऊ नये.
बाबा पार्टे म्हणाले, हद्दवाढ देता येत नाही हे जाहीर करावे. हद्दवाढीशिवाय निवडणूक घेता येणार नाही, असे सरकारला कळवावे.

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 1942 पासून शहराची हद्दवाढ होत नाही. नगराध्यक्ष जाऊन महापौर आले, मुख्याधिकारी जाऊन आयुक्‍त आले. नगरपालिकेेचे महापालिकेत रूपांतर झाल्यावर एवढाच बदल झाला आहे. शहराजवळील गावांचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी हद्दवाढ हवी.

अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, हद्दवाढीचा प्रश्‍न समन्वयाने सोडवला पाहिजे. त्यासाठी प्रशासकांनी नेतृत्व करावे. सद्भावना व समन्वय यात्रा सुरू करावी. प्रशासनच ग्रामीण जनतेचा राग शमवू शकेल. त्यासाठी आता हीच योग्य वेळ आहे. अनेक गावांत सकारात्मक विचार सुरू आहे. 29 ऑक्टोबर रोजी नगरविकास मंत्री कोल्हापुरात येत असून त्यांच्यासोबत बैठकीचे नियोजन करावे.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे म्हणाले, पुण्यास 17 वेळा हद्दवाढ मिळाली. मग कोल्हापूरला का नाही? कोल्हापूर सवतीचे पोर आहे का? महापालिका प्रशासनाने जनतेची दिशाभूल दूर करावी.

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, लोकप्रतिनिधींना हद्दवाढ करायची नसेल तर वेगळा विचार करावा लागेल. शहराने 42 गावांना रोजगार दिला आहे. आता शहराच्या विकासास हातभार लावण्याची या गावांची जबाबदारी आहे. जी गावे विरोध करतील त्या गावांना रोजगार देणे बंद करू.

क्रिडाईचे अजय कोराणे म्हणाले, ग्रामीण भागात नियंत्रित व नियोजबद्ध विकास होण्यासाठी प्राधिकरण आले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. भाकपचे सतीशचंद्र कांबळे म्हणाले, आतापर्यंत सात प्रस्ताव पाठवले आहेत. प्रत्येक प्रस्तावास उत्तर देताना शासनाने संबंधित गावांचा विरोध असल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे प्रबोधन करून लोकांची मानसिकता बदलली पाहिजे.

माजी नगरसेविका रूपाराणी निकम म्हणाल्या, ग्रामीण जनता महापालिकेच्या सुविधा घेते, मग विरोध का करते, याचा विचार केला पाहिजे. माजी नगरसेवक अनिल कदम म्हणाले, प्राधिकरणाचा काहीच उपयोग न झाल्याने ते रद्द करावे.

अनिल घाटगे म्हणाले, 80 टक्के ग्रामीण जनता हद्दवाढीस तयार आहे. प्रशासनाने संबंधित 20 गावांत प्रबोधन करावे. ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई म्हणाले, हद्दवाढ नसल्याने शहराचा विकास झाला नाही. किशोर घाडगे म्हणाले, हद्दवाढ होणार का नाही? की केवळ चर्चा आहे. हे स्पष्ट करावे. लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे सुभाष जाधव म्हणाले, हद्दवाढीसाठी टोल आंदोलनाप्रमाणे आंदोलन करू. डॉ. संदीप पाटील यांनी मेडिकल हबसाठी हद्दवाढीची गरज असल्याचे सांगितले. बाजीराव नाईक म्हणाले, शहरात जागाच शिल्‍लक नसल्याने पर्यावरणाचा प्रश्‍न उद्भवल्याचे सांगून हद्दवाढ झाली पाहिजे.

राजू जाधव यांनी आभार मानले. यावेळी अ‍ॅड. शिवाजी राणे, श्रीकांत भोसले, दुर्गेश लिंग्रस, अशोक भंडारे, जयकुमार शिंदे, पांडुरंग अडसुळे, यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शासनाकडून मार्गदर्शन येताच कार्यवाही

26 फेब—ुवारी 2021 रोजी शासनाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी सहा महिने आणि निवडणूक होईपर्यंत हद्दवाढ करता येत नाही, असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. मार्गदर्शन येताच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी शिष्टमंडळास दिली.

Back to top button