कोल्हापूर : पोलिसांनी बदलली शारीरिक तंदुरुस्तीची व्याख्या | पुढारी

कोल्हापूर : पोलिसांनी बदलली शारीरिक तंदुरुस्तीची व्याख्या

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : सर्वसामान्यांच्या मनामध्ये पोलिस या व्यक्तीविषयी काय कल्पना असते… विशेषतः त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल समाजमन काय म्हणते… सर्वसाधारण कानोेसा घेतला, तर नोकरीत भरती झाल्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती हरवलेला कर्मचारी म्हणून त्याविषयी प्रतिकूल प्रतिक्रियांचा सूर आळवला जात असला, तरी कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या 119 पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांनी समाजमनाचा हा अंदाज खोटा ठरवला आहे. या अधिकारी-कर्मचार्‍यांनी आपल्या वयाचा अमृतमहोत्सव पार पाडला आहे. यातील बहुसंख्य नव्वदीच्या उंबरठ्यावर, तर एका बहाद्दराने वयाचे शतक झळकावताना 102 वर्षांचा पल्ला गाठला आहे. या सर्व ज्येष्ठ कर्मचार्‍यांना दिनांक 30 मे रोजी सन्मानित करून मानवंदना दिली जाणार आहे.

कोल्हापुरातील छत्रपती शाहू निवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशन या संघटनेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्याचे निवृत्त अपर पोलिस महासंचालक भगवंतराव मोरे यांच्या हस्ते पोलिस ग्राऊंडजवळील अलंकार हॉलमध्ये हा कार्यक्रम होत आहे. निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक रामराव पवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आणि अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे निवृत्त अपर पोलिस महासंचालक खंडेराव शिंदे भूषविणार आहेत.

राज्यात पोलिसांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर आजवर अनेक वेळा टीका झाली. कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या या कर्मचार्‍यांच्या व्यंगावर अनेक वेळेला व्यंगचित्रही रेखाटले गेले. राज्याच्या विधानसभेत पोलिसांच्या वाढत्या पोटावरही चर्चा झाली. अवाढव्य अंग सुटलेला आणि चोराच्या मागे धावण्यात अपयशी ठरणारा पोलिस चित्रपटातही दाखविला गेला. सेवा बजावत असताना ताणतणाव, तो घालविण्यााठी व्यसनांचा आधार आणि आजारावर इलाज म्हणून रोज मूठभर औषधांच्या गोळ्या खाणारा कर्मचारी म्हणून त्याची चेष्टाही झाली. पण काळ बदलतो आहे. प्रकृतीच्या तंदुरुस्तीविषयी जागरुकता आल्यामुळे अनेकांनी आपल्या रोगाचे निदान पहिल्या टप्प्यातच करून त्याला हाकलून लावले. पोलिस कल्याण निधीतून आरोग्य शिबिरांद्वारे सतत तपासण्या त्याला उपयोगी ठरल्या. जिल्ह्यातून राज्याच्या कानाकोपर्‍यात सेवा बजावणार्‍या 119 अधिकारी-कर्मचार्‍यांनी त्याची साक्ष घालून दिली आहे.

या 119 पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये पोलिस कॉन्स्टेबल, हवालदार, उपनिरीक्षक, निरीक्षक, उपअधीक्षक पदावर काम करणारे अनेक कर्मचारी आहेत. तसेच 102 वर्षे पूर्ण केलेले पन्हाळगडचे सुपुत्र निवृत्त डीवायएसपी मनोहर बांदिवडेकर यांचाही यामध्ये समावेश आहे. या सन्मान सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष निवृत्त पोलिस उपअधीक्षक पंढरीनाथ मांढरे व कार्याध्यक्ष पोलिस निरीक्षक बाबासाहेब गवाणी यांनी केले आहे.

Back to top button