कोल्हापुरातील वाहतूक ‘मलई तेथे कल्हई’? | पुढारी

कोल्हापुरातील वाहतूक ‘मलई तेथे कल्हई’?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिकेचे क्षेत्र 66.82 चौरस किलोमीटर इतके आहे. परंतु या क्षेत्रापैकी केवळ काही मोजक्याच रस्त्यांवरील नो पार्किंगमधील गाड्या उचलणारी शहर वाहतूक पोलिसांची वाहने का फिरतात? तसेच संबंधित रस्त्यांवरील दुकानदारांच्या नो पार्किंगमधील लावलेल्या गाड्या का उचलल्या जात नाहीत? शिवाय अन्य ठिकाणी वाहतुकीची कोंडी, गर्दीच्या रस्त्यांवर दुहेरी पार्किंग असूनही तिकडे वाहतूक शाखेच्या गाड्या का जात नाहीत? कोल्हापुरातील सजग माणसाला पडलेले हे प्रश्न आहेत. अन्य रस्त्यांवरील बेजबाबदार पार्किंगकडे दुर्लक्ष करून जर हा उद्योग होत असेल, तर उद्या नागरिकांनी वाहतूक पोलिसांवर ‘मलई तेथे कल्हई’ असा ठपका ठेवला, तर तो खोडून काढता येणे अशक्य आहे. पर्यटकांना याचा नाहक त्रास होत आहे.

मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात येतात. पर्यटकांची संख्या सुट्टीच्या दिवशी लाखांचा उंबरठा ओलांडते आहे. या पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने सध्या वाहतूक पोलिसांनी काही ठरावीक मार्गांवरील पार्किंगलाच आपले लक्ष्य केल्यासारखे वातावरण आहे. यामध्ये सराफी बाजारपेठ म्हणून ओळखणार्‍या गुजरीमध्ये तर प्रत्येक 15 मिनिटाला वाहतूक पोलिसांची गाड्या उचलणारी गाडी येते. दररोज शेकडोंच्या घरात गाड्या उचलल्या जातात.

दंडाच्या पावत्या फाडल्या जातात. जेथे नागरिक वा ग्राहकाचे बेकायदेशीर पार्किंग म्हणून वाहन उचलले जाते, तेथे त्याच्या शेजारी असलेले दुकानदाराचे वाहन मात्र उचलले जात नाही. गाडी आली की, दुकानदार दरवाजात येतो. वाहतूक पोलिसांना हात करतो आणि विनापार्किंगमधील गाडी तशीच ठेवून वाहतूक पोलिसांच्या गाडीचा मोर्चा पुढे जातो. हा दुजाभाव कशासाठी? गाड्या न उचलण्याची विशेष सवलत देण्याचे अधिकार कोणी दिले, याची वरिष्ठांनीच आता चौकशी केली पाहिजे. कारण सामान्यांतील सामान्यांना मिळणार्‍या दुहेरी वर्तणुकीविषयी असंतोष वाढतो आहे.

Back to top button