पाण्यातील ब्रिटिशकालीन रस्ते, दगडी पुलाचा दर्जा अधोरेखित | पुढारी

पाण्यातील ब्रिटिशकालीन रस्ते, दगडी पुलाचा दर्जा अधोरेखित

राशिवडे, प्रवीण ढोणे : शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून दूरद़ृष्टीच्या राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाची निर्मिती केली. ही निर्मिती करताना ब्रिटिशकालीन दगडी पूल, रस्त्याचे अस्तित्व धरणाच्या पाणी साठ्यामध्ये गाडले गेले. पण धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या दस्तुरीजवळील हे रस्ते, पुलाचे अस्तित्व शंभर वर्षांनंतरही भक्कम असल्याचे दिसून येत आहे.

शंभर वर्षांपूर्वी राधानगरी धरणाच्या उभारणीस प्रारंभ झाला असला तरी त्याआधी याठिकाणी लहान नदी वाहत होती. याच नदीच्या काठावरून ब्रिटिशकालीन रस्त्यावरून कोकणाकडे ये-जा होत होती. कालांतराने धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होऊ लागल्यानंतर हा रस्ता, जुने तीन दगडी पूल उन्हाळा वगळता कायम पाण्यात झाकोळले जात होते. परंतु सध्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने या दगडी पुलासह रस्त्याचे अस्तित्व कायम असल्याचे दिसून येत आहे.

दाजीपूर (दस्तुरी) बॅकवॉटर जवळील दगडी पुलाजवळ वस्तीचे अस्तित्व दिसून येत आहे. याठिकाणी पाच-सहा घरेही असल्याचे तेथील पाडलेल्या अर्धवट बांधकामावरून दिसून येत आहे. तेथील स्थानिक माहिती नुसार याठिकाणी धर्मशाळा चिर्‍याची होती व पाडलेली घरे, चुली, धान्य दळपाचे दगड, खोल्यांचे अस्तित्व असे रूप दिसून येत आहे. दाऊवाडीजवळून कोकणकडे गेलेला ब्रिटिशकालीन रस्ता आणि दगडी पूल शंभर वर्षांनंतरही भक्कम स्थितीत आहेत. शंभर वर्षांपूर्वीचा जांभा दगड वापरून बनवलेला रस्ता, चुना आणि दगड याने बांधकाम केलेले दगडी पूल पाण्याखाली राहूनही आज भक्कम आहेत. हे प्रामाणिक आणि चांगल्या कामाचे प्रतीकच समजावे लागेल.

Back to top button