विकासकामांसाठीचा संघर्ष दुर्दैवी : आ. सतेज पाटील

विकासकामांसाठीचा संघर्ष दुर्दैवी : आ. सतेज पाटील
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आम्ही कोल्हापूर शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे; मात्र विरोधकांचा अजेंडा वेगळा आहे. कोल्हापूरची जनता नेहमीच विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. यापूर्वी मंजूर केलेली विकासकामे करण्यासाठी ही संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे, अशी खंत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर महापालिका अंतर्गत न्यू शाहूपुरी व नागळा पार्क प्रभागातील रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. आ. जयश्री जाधव व आ. ऋतुराज पाटील उपस्थित होते.

आ. सतेज पाटील म्हणाले, एप्रिलपर्यंत आम्ही बॅटिंग करत होतो. तेव्हा कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणला. आत्ता आम्हाला फिल्डिंग करावी लागत आहे; मात्र आम्ही आणलेल्या निधीतही आडकाठी घालण्याची सत्ताधार्‍यांचे धोरण आहे. जनतेतून निवडून आलेल्या आ. ऋतुराज पाटील व आ. जयश्री जाधव यांनी सुचवलेली विकासकामे प्रशासन करत नाही मात्र जनतेने नाकारलेल्यांची कामे होत आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेत नगरसेवक नाही. इतरत्र सर्व निवडणुका होत आहेत; मात्र महापालिकेच्या निवडणुका घेण्यास सरकार घाबरत आहे.

रस्त्यांच्या कामासाठी आम्ही आणलेला निधी रद्द करून, तो निधी बाकडी आणि ओपन जिमसाठी वळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. यामधून 40 टक्केचा कर्नाटकी पॅटर्न कोल्हापुरात येऊ पाहत असल्याचा टोला आ. सतेज पाटील यांनी लगावला. विकासकामांची वचनपूर्ती करताना मनस्वी आनंद असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.

यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांचे भाषण झाले. यावेळी अनुग्रह हॉटेल ते आयुक्त बंगला ते निवडणूक कार्यालय या रस्त्याच्या लादीकरण व डांबरीकरण कामाचा आणि नागाळा पार्क प्रभागातील हॉटेल पाटील वाडा ते ध—ुव रेसिडन्सी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, प्रसाद कामत यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news