कोल्हापूर : शेतकरी संघाच्या कार्वे शाखेत 60 लाखांचा अपहार | पुढारी

कोल्हापूर : शेतकरी संघाच्या कार्वे शाखेत 60 लाखांचा अपहार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शाखेचे ताळेबंद पत्रक देण्याच्यावेळी प्रशासनाला चकवा देत आजवर शासकीय अधिकार्‍यांच्या प्रशासक मंडळापासून अशासकीय मंडळाचीही फसवणूक करणार्‍या शेतकरी संघाच्या कार्वे (ता. चंदगड) शाखेतील शाखाधिकार्‍याने 60 लाखांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी उघड आले आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई, सदस्य अजित मोहिते यांनी हे बिंग बाहेर काढले. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने त्याची शासकीय लेखापरीक्षकांच्या मार्फत चौकशी सुरू आहे. यातून फसवणुकीचा आकडा बाहेर पडणार आहे.

शेतकरी संघात गेल्या दहा वर्षांत मोठ्या रकमेच्या अपहाराच्या आठ ते दहा घटना उघडकीस आल्या आहेत. त्याची वसुली सुरू आहे. तरीही संघाचे शाखा व्यवस्थापक सावध झाल्याचे दिसत नाहीत. बोटावर मोजण्याइतके शाखा व्यवस्थापक सोडल्यास वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत भ्रष्टाचाराची साखळीच संघात कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संघाची जागा विक्री करा, शाखा बंद करा, असे उपाय करूनही संघ तोट्यात असून यातून बाहेर येण्याची चिन्हे दिसत नाहीत.

कार्वे शाखाधिकार्‍याकडून गेली तीन ते चार वर्षे संघाच्या रकमेचा अपहार सुरू आहे. पण या घटनेची माहिती संघ प्रशासन व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या का निदर्शनास आली नाही, हा मोठा प्रश्न आहे. दुसर्‍या बाजूला संघातील वरिष्ठ अधिकारी संघाच्या कामाकडे निष्ठेने लक्ष देत नाहीत, यातून स्पष्ट होत आहे.

सकाळी प्रार्थना, दुपारी भ्रष्टाचार

संघाच्या मुख्यालयात सकाळी कामावर आल्यानंतर भ्रष्टाचार करणार नाही, सहकाराची निष्ठेने सेवा करेन, अशी प्रार्थना केली जाते. संघ मोठ्या आर्थिक संघटातून वाटचाल करत आहे. पण संघातील दररोज सकाळची प्रार्थना थांबलेली नाही. सकाळी प्रार्थना आणि दुपारी भ्रष्टाचार, असा प्रकार सध्या संघात सुरू आहे.

संघात अधिकार्‍यांकडून गैरव्यवहार

सावज शोधणे, कनिष्ठ कर्मचार्‍यांना त्रास देणे, शाखाधिकार्‍याला संघाच्या मुख्यालयात बोलावून हप्ता का दिला नाहीस म्हणून त्याला झापणे, असे प्रकार संघात सुरू आहेत. हे गोड गुपीत अनेकांना माहिती आहे. पण त्या पापाचा धनी कोणी व्हावयाचे, यातून अशी प्रकरणे दाबण्याचे प्रकार संघात सुरू आहेत.

शाखेचा ताळेबंद देण्यास नकार

कार्वेच्या शाखाधिकार्‍यास ताळेबंद पत्रक का सादर करत नाही, एवढे विचारल्यानंतर त्याने शाखेचा ताळेबंद तयार झालेला नाही, असे म्हणत आठ ते दहा दिवसानंतर देतो, असे सांगून चालढकल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अधिक चौकशी झाली, त्यातून हे प्रकरण बाहेर आले आहे. पण अशीच प्रकरणे अन्य शाखांमध्ये सुरू आहेत, त्याची संघाच्या आवारात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्याची चौकशी कधी होणार, असा प्रश्न आहे.

Back to top button