

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा: खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुरातत्त्व खात्याला पत्र पाठविण्याबाबत आमचा कोणताच विरोध नाही. संबंधित पत्रात चुका होत्या. त्या न पाहता ग्रामसेवक आणि सरपंच सारिका कदम यांनी सह्या केल्या होत्या. त्यामुळे चुकीचे पत्र फाडून ऑपरेटरला दुसरे पत्र तयार करण्यास सांगितले. त्यामुळे पत्राचा अवमान झाला का? असा सवाल करत सध्या सुरू असलेले घाणेरडे राजकारण बंद करावे. आणि गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन माजी उपसरपंच कुलदीप कदम यांनी आज (दि. २८) पत्रकार परिषदेत केले.
गावाच्या स्वच्छतेसाठी मानधन तत्वावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्याला विरोध करण्यासाठी काही सदस्यांनी पुरातत्त्व खात्याला पाठवण्यात येणाऱ्या पत्रात चुका होत्या. ते पत्र दुरुस्ती करून दुसरे पत्र सभेपुढे ठेवण्यात येणार होते. मात्र, शब्दांच्या चुका असलेले पत्र फाडल्याचे काही जणांकडून राजकारण सुरू आहे. राजकीय आणि धार्मिक रंग देत बदनामीचे षड्यंत्र रचून काही ग्रा.प. सदस्यांनी बागलबुवा सुरू केला आहे, असा आरोप कदम यांनी केला. चुकीच्या शब्दांचे पत्र दिले असते, तर ग्रा.प सदस्य आणि सरपंचांची नाचक्की झाली असती. परंतु पत्र फाडणारा मी सरपंच पती असल्याने मला टार्गेट केले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
संपूर्ण गावाच्या स्वच्छतेसाठी ५ कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने अल्प मानधन तत्वावर एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. परंतु, कर्मचारी नियुक्तीवरून ग्रा.प. सदस्यांनी घाणेरडे राजकारण सुरू केले आहे, असा घणाघात कदम यांनी यावेळी केला.
हेही वाचा