स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोरोना स्थिती पाहून : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे | पुढारी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोरोना स्थिती पाहून : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्गामुळे काही नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. कोरोनाची सध्याची स्थिती पाहून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, कोरोनाची स्थिती अद्याप निवळलेली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय घेताना याचाही विचार करावा लागणार आहे. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटा मागितला आहे. त्याबाबतचा ठराव सभागृहात करण्यात आला आहे. आरक्षणासंदर्भात सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आता केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबतचा निकाल दिला आहे. राज्यातील स्थिती पाहून केंद्र सरकारने निर्णय घ्यायला हवा, असेही मंत्री तनपुरे म्हणाले.

प्राध्यापक भरतीसंदर्भात उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच निर्णय जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सरकार योग्य पावले उचलत आहे. महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक सत्र सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्याबाबत मतमतांतरे असल्याची आपल्याला माहिती नाही. यासंदर्भातील माहिती घेऊन योग्य तो निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button