कोल्हापूर : पंचगंगेतली जलपर्णी... काढायची कोणी? | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगेतली जलपर्णी... काढायची कोणी?

कोल्हापूर, डॅनियल काळे : पंचगंगेचे प्रदूषण वाढत चालले आहे. ‘देशातील दहा प्रदूषित नद्यांतील एक’ असा बदलौकिक पंचगंगेच्या माथी मारला आहे. नदी शुद्धीकरणाच्या अनेक घोषणा झाल्या. अगदी अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचगंगेची महाआरती केली आणि पंचगंगा प्रदूषणमुक्तीचे पुन्हा एकदा आश्वासन दिले; मात्र आता आलेल्या जलपर्णीने हे आश्वासन कागदावरच राहिल्याचे दाखवून दिले आहे. पंचगंगेतील जलपर्णी काढायची कोणी? त्याची जबाबदारी कोणावर? प्रदूषण करणारे घटक कोण? त्याचे निर्मूलन करण्याची जबाबदारी कोणावर, या सार्‍या प्रश्नांची उत्तरे द्यायची कोणी, असा सवाल आहे.

पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या अनेक घोषणा झाल्या; पण ठोस कृती होत नाही. नदीचे प्रदूषण सुरूच आहे. या प्रदूषणाने जलपर्णी पुन्हा वाढत आहे. जलपर्णी काढणे हा तात्पुरता उपाय झाला; पण प्रदूषण रोखण्याकडे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या, असे कोणाला वाटत नाही. नदीपात्रात पसरलेली जलपर्णी काढण्यासाठीसुद्धा कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. दरवर्षी जलपर्णी काढण्यापेक्षा जलपर्णी येणारच नाही, अशी पाण्याची शुद्धता ठेवणे सरकारला कधी जमणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

जबाबदारी कोणाची?

प्रदूषण नियंत्रणासंदर्भात प्रत्येकजण जबाबदारी झटकत आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पाटबंधारे विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळदेखील जबाबदारी झटकत आहे. प्रदूषण रोखल्याचा दिखावा निर्माण करत थातूरमातूर उपाययोजनांवरच सरकारी यंत्रणांचा भर आहे.

* पंचंगगा नदीत दूषित पाणी सोडणार्‍या गावांची संख्या 89
* नदी प्रदूषणात कोल्हापूर शहर, इचलकरंजीचा मोठा वाटा
* सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नावापुरतेच
* प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ कागदी घोडी नाचविण्याचे काम

Back to top button