कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी होत नसल्याने जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले. दरम्यान, व्यापार्यांनी सोमवारपासून (दि. 12) सर्वच दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात पुन्हा संघर्षाची शक्यता आहे.
शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याने सरसकट सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी व्यापार्यांनी मागणी केली आहे. प्रशासनाकडून मात्र त्यास अनुमती मिळालेली नाही. त्यामुळे व्यापार्यांनी सोमवारपासून सर्वच दुकाने सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, चेंबर ऑफ कॉमर्सने प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांवर असल्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौथ्या टप्प्याचे निर्बंध कायम ठेवले. त्यामुळे शहरातील सुरू असलेली अन्य दुकानेही पुन्हा बंद झाली आहेत.
राजारामपुरीसह महाद्वार आणि गुजरी परिसरातील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यापार्यांनी केला आहे. महाद्वार रोड परिसरात व्यापार्यांनी रविवारी सकाळी एकत्र येऊन व्यापार पुन्हा सुरू करणार असल्याचे स्पष्टकेले. तर राजारामपुरीत व्यापारी असोसिएशनने बैठक घेऊन दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुकाने सुरू झाल्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या घटली
तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर राज्य शासनाने शहरातील व्यापार सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सुरू करण्यास परवानगी दिली होती. पाच दिवस शहरातील व्यापार सुरू झाले. या कालावधीत रुग्णांची संख्या आधीच्या आठवड्याइतकीच राहिली. ती वाढली नाही. त्यामुळे व्यापार सुरू करण्याने संसर्ग वाढत नाही. ही आमची भूमिका खरी ठरल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी असोसिएशनच्या बैठकीत केली. सोमवारपासून पुन्हा व्यापार सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची ही विशेष बैठक रविवारी सायंकाळी झाली. संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्याची भूमिका, महाराष्ट्र चेंबरतर्फे सरकारकडे आग्रहाने मांडली असल्याची माहिती दिली.
आवश्यक त्या सर्व खबरदारी घेत व्यापार सुरू केला आहे. त्यामुळे सोमवारपासून आम्हाला व्यापार सुरू करण्यास सरकारने तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी सेक्रेटरी रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, खजानिस अनिल पिंजाणी, माणिक पाटील-चुयेकर, प्रताप पवार, प्रीतेश दोशी, स्नेहल मगदूम, अतुल लोंढे, शाम बासराणी, दीपक पुरोहित, भरत रावळ, इंदर चौधरी, सनत श्रीश्रीमाळ आदी संचालक उपस्थित होते.
चेंबर ऑफ कॉमर्स प्रशासनाबरोबर; काही व्यापारी विरोधात
एकीकडे चेंबर ऑफ कॉमर्स शासनाच्या विरोधात जाण्याच्या मानसिकतेत नसताना; दुसरीकडे मात्र काही व्यापार्यांनी सोमवारी दुकाने सुरू करणारच, अशी भूमिका घेतली आहे. महाद्वार रोड व सराफ असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी रविवारी शहरातील सर्व दुकाने का सुरू केली जात नाहीत? दुकाने सुरू करा म्हणून सतत आंदोलन करायचे का? असा संतप्त सवाल केला आहे. शासन काहीही निर्णय घेऊ दे, दुकाने सुरू ठेवायचीच, अशी ठाम भूमिका या व्यापार्यांनी घेतली आहे.
१५२२ नवे रुग्ण; ३२ जणांचा मृत्यू
कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यावरील कोरोना संसर्गाचे संकट अजूनही कायम आहे. गेल्या 24 तासांत नवे 1,522 रुग्ण आढळले. 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांत जिल्ह्यातील 30, तर अन्य जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. यातील 12 जणांना दीर्घकालीन आजार होते.
मृतांत 60 वर्षांवरील 18 जण आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 48 तासांमध्ये त्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांमध्ये कोल्हापूर शहरातील 288 जणांचा समावेश आहे. शहरातीलमृतांची संख्या दहा आहे.
आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालांनुसार बाधितांची तालुकानिहाय संख्या अशी, आजरा 66, भुदरगड 36, चंदगड 24, गडहिंग्लज 93, गगनबावडा 3, हातकणंगले 193, कागल 112, करवीर 260, पन्हाळा 81, राधानगरी 42, शाहूवाडी 43, शिरोळ 126. बाधितांमध्ये नगरपालिका कार्यक्षेत्रातील 135 नागरिक आहेत. अन्य जिल्ह्यांतील 20 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
शहरातील मृतांमध्ये शिवाजी पेठ, रंकाळा रोड, राजोपाध्येनगर, जुना बुधवार पेठ, विचारे माळ, आझाद गल्ली, गंगानगर, सी.बी.एस. परिसरातील प्रत्येकी एकाचा, तर साईक्स एक्स्टेंशन येथील दोघांचा समावेश आहे. उर्वरित मृतांमध्ये करवीर 5, पन्हाळा, गडहिंग्लज, शाहूवाडी तालुक्यांतील प्रत्येकी 2, हातकणंगले 6, आजरा, शिरोळ, राधानगरी तालुक्यांतील प्रत्येकी 1, तर सांगली जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.