इचलकरंजीत चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

इचलकरंजीत चोरट्यांचा धुमाकूळ

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : जवाहरनगर येथील सरस्वती को-ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये बुधवारी रात्री तब्बल 7 फ्लॅट फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. त्यामध्ये लाखो रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. सातजणांपैकी तिघांच्या तक्रारींवरून तब्बल 10 लाख 17 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे. उर्वरित चौघे फ्लॅटधारक परतल्यानंतर उर्वरित मुद्देमालाचा तपशील समजणार आहे. भरवस्तीत झालेल्या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, परिसरातीलच आणखीन एका अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी दहा हजार रुपये लांबवल्याची चर्चा आहे. सरस्वती सोसायटीच्या विविध इमारतींमधील फ्लॅटमध्ये राजकुमार रंगराव थोरवत, सुनील भूपाल पाटील, महेश सुभाष पांडव, रवी लाहोटी, शोभा श्रीवास्तव-भोसले, अजय दायमा व आनंद निंबाळकर राहतात. यापैकी काही जण सुट्टीसाठी परगावी गेले आहेत. चोरट्यांनी सातही फ्लॅटच्या मुख्य दरवाजांचे लॉक उचकटून आत प्रवेश केला. यातील तब्बल 20 कपाटे फोडून साहित्य विस्कटले. दोन ते तीन तास चोरट्यांचा धुमाकूळ सुरू होता.

चोरीची घटना समजताच फ्लॅटधारकांमध्ये खळबळ उडाली. सातपैकी राजकुमार थोरवत, सुनील पाटील व महेश पांडव घरी परतले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या तिघांच्या घरातील मिळून तब्बल 2 लाख 42 हजारांची रोकड व 7 लाख 75 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत; तर रवी लाहोटी, शोभा श्रीवास्तव, अजय दायमा गावाहून परतल्यानंतरच त्यांच्याकडील चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा तपशील समजणार आहे. आनंद निंबाळकर यांचा फ्लॅटही चोरट्यांनी फोडला. तिथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

घटनास्थळी प्रभारी पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट दिली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी आणलेले श्वानपथक घटनास्थळीच घुटमळले.

Back to top button