कोल्हापूर : कावणेतील मल्लाला नियतीनेच हरविले | पुढारी

कोल्हापूर : कावणेतील मल्लाला नियतीनेच हरविले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कुस्ती मैदानात अनेक मल्लांना चितपट करणार्‍या कावणे (ता. करवीर) येथील शिवदत्त ऊर्फ सोन्या मारुती पाटील या 28 वर्षीय उमद्या मल्लावर मंगळवारी (दि. 23) काळाने घाला घातला. सकाळी कडबाकुट्टी मशिन सुरू करत असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे ज्याचा सततचा नावलौकिक ऐकण्याची सवय असलेल्या कावणेकरांना या हृदयद्रावक घटनेने धक्का बसला.

सोन्या पाटील हा वयाच्या दहाव्या वर्षांपासून तालमीत सराव करत होता. अनेक मैदाने गाजवून त्याने स्वतःबरोबरच गावाचा नावलौकिक वाढविला होता. वडील मारुती पाटील गोकुळ दूध संघात प्रशिक्षण वर्गाचे अधिकारी, प्रवचनकार. या वारकरी घराण्यातील सोन्याला नियतीनेच हिरावून नेले. लहानपणापासूनच व्यायामाची आवड असल्याने 107 किलो वजन, 6 फूट 4 इंच उंची बलदंड शरीरयष्टी त्याने निगवे खालसा तालमीत सराव करून कमावली होती. घरची शेती, दुग्ध व्यवसाय असल्याने तो जनावरांची देखभाल करत होता. मंगळवारी नेहमीप्रमाणे कडबाकुट्टी करण्याकरिता तो शेतातील गोठ्यात गेला होता. मशिन सुरू करताना त्याला विजेचा जोराचा धक्का बसला. त्यातच तो जागीच गतप्राण झाला. सोन्याची ही कडबाकुट्टी जनावरांसह, कुटुंबीयांना तसेच गावकर्‍यांसाठी अखेरची ठरली.

Back to top button