

कोल्हापूर; अनिल देशमुख : राज्यात हेली टूरिझम राबविण्याचा पर्यटन संचालनालयाचा विचार आहे. राज्यात हेली टूरिझमला मोठा वाव असल्याने जिल्ह्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्यात पर्यटनस्थळांची संख्या प्रचंड आहे. राज्याचा बहुतांशी भाग पर्यटनद़ृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. सह्याद्री, सातपुड्याच्या रांगा, माथेरान, महाबळेश्वर, पन्हाळा यासारखी थंड हवेची ठिकाणे, अजिंठा-वेरूळ, ताडोबा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, दाजीपूर, सागरेश्वर अभयारण्य, सह्याद्री व्याघ— प्रकल्प, विविध धरणांचे जलाशय, गडकोट, तीर्थक्षेत्र आदी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आले आहेत. राज्यात दरवर्षी सुमारे 14 टक्के विदेशी पर्यटक येतात. हे पर्यटक राज्यातील ठराविक भागांनाच भेट देतात. राज्यात सर्वत्र देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन संकल्पना राबवणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर हेली टूरिझम प्रकल्पाचा विचार पुढे आला आहे.
या प्रकल्पाला राज्यात मोठी संधी आहे. हेली टूरिझममुळे स्थानिक अर्थ व्यवस्थेला चालना मिळेल व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीस हातभार लागेल, असा विश्वास आहे. यामुळे ही योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचा पर्यटन संचालनालयाचा प्रयत्न आहे.
हेली टूरिझम संकल्पनेंतर्गत जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी हेलीपॅड व इतर पर्यटक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्रस्तावित हेलीपॅडवरून ज्या पर्यटनस्थळाकडे जायचे आहे, त्या पर्यटन स्थळी हेलीपॅड व इतर पर्यटकविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याकरिता जिल्ह्यातील पर्यटन क्षमतेचा, पर्यटन स्थळांना भेटी देणार्या पर्यटकांची संख्या, जिल्ह्याचा 'यूएसपी' विचारात घेऊन हेली टूरिझम प्रकल्पाकरिता किमान 2 ते 5 एकर शासकीय जागेसह हेली टूरिझम विकासाचे प्रस्ताव पर्यटन संचालनालयाने राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकार्यांकडे मागवले आहेत.
पर्यटन क्षेत्राचे राज्याच्या आर्थिक विकासात मोठे योगदान आहे. पर्यटन व्यवसायाद्वारे 5.9 मिलियन लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. हेली टूरिझममुळेही रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.