‘जोतिबा प्राधिकरणा’साठी मास्टर प्लॅन | पुढारी

‘जोतिबा प्राधिकरणा’साठी मास्टर प्लॅन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जोतिबा प्राधिकरणासाठी करण्यात येणार्‍या कामांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. जून अखेर या प्राधिकरणासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

जोतिबा प्राधिकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित शासकीय विभागांच्या प्रमुखांची मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक विभागाने प्राधिकरणात आपल्या विभागासाठी कोणत्या बाबी अपेक्षित आहे, त्याचे सादरीकरण केले. बैठकीत या प्रत्येक बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्राधिकरणात आवश्यक बाबींच्या विभागनिहाय कामांची यादी तयार करावी. सर्व विभागांची यादी एकत्रित करून, त्याचे लोकप्रतिनिधींसमोर सादरीकरण केले जाईल, यानंतर नेमक्या कामांची यादी तयार केली जाईल, असे रेखावार म्हणाले.

प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागांतर्गत आवश्यक कामांची यादी तयार करावी, असे सांगून रेखावार म्हणाले, ही यादी अंतिम झाल्यानंतर कामांचे प्राधान्य क्रम निश्चित केले जातील. दरम्यान, प्राधिकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आर्किटेक्ट सल्लागारासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्याची मुदत दि.12 जून पर्यंत आहे. यानंतर सल्लागाराची नियुक्ती होईल आणि जूनअखेर आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल.

सल्लागार नियुक्त झाल्यानंतर विभागाकडून सादर करण्यात आलेली यादी त्यांच्याकडे दिली जाईल. त्यानुसार सर्वकष आराखडा तयार केला जाईल, असेही रेखावार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Back to top button