काजू बोर्ड प्रस्ताव कोल्हापूरचा… मुख्यालय मुंबईला ! | पुढारी

काजू बोर्ड प्रस्ताव कोल्हापूरचा... मुख्यालय मुंबईला !

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर जिल्ह्यातीन चार तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर काजू बियांचे उत्पादन होते. त्यामुळे काजू बोर्डाची स्थापना करून चंदगड तालुक्यात याचे मुख्यालय स्थापन करावे, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केला होता. पण या बोर्डाचे मुख्यालय नवी मुंबईत आणि विभागीय कार्यालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. यामुळे प्रस्ताव दिलेल्या कोल्हापूरच्याच पदरी निराशा पडली आहे. जिल्ह्यातील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे घडले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घातले असते तर या बोर्डाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला असता.

कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, आजरा, भुदरगड हे तालुके आणि गडहिंग्लज तालुक्याच्या काही भागात सुमारे तीन ते चार हजार हेक्टवर काजूचे उत्पादन घेतले जाते. एकट्या चंदगड तालुक्यात वर्षाला ५० कोटीचे काजू उत्पादित होतात. आजरामध्ये ३० ते ३२ कोटी, भुदरगड १० ते १२ कोटी व राधानगरी, गगनबावडा या तालुक्यातील काही भागात काजूचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात वर्षाला १०० कोटीहून अधिक रुपयांचे काजू उत्पादन होते. हे उत्पादन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादनापेक्षा नक्कीच जास्त आहे.

या विकासासाठी शासनाच्या पाठबळाची गरज आहे. त्यामुळे काजू बोर्ड स्थापन करावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे चंदगडसह जिल्ह्यातून होत होती. या मागणीचा विचार होऊन २०१८ मध्ये शासनाने पणन मंडळाच्या अखत्यारित काजू फळ पीक विकास योजना लागू केली होती. काजूची वाढती मागणी आणि उत्पादन याचा विचार करून शासनाने बोर्डाची स्थापना केली.

दरम्यान, जिल्ह्यात विशेष चंदगड, आजरा या दोन तालुक्यांत होणारे काजूचे उत्पादन आणि त्याची उलाढाल याचा प्रस्तावात आढावा घेण्यात आला होता. काजू बोर्ड स्थापन करून त्याचे मुख्यालय चंदगड येथे करावे, यामुळे चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल, असे प्रस्तावातून सुचविण्यात आले होते. यातून काजू बोर्ड स्थापन झाला. पण मुख्यालय हे वाशी नवी मुंबईत आणि विभागीय कार्यालये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग होणार आहे..

 

Back to top button