

हमिदवाडा, पुढारी वृत्तसेवा : येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 22 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 25 जूनला मतदान होणार आहे.
मंडलिक कारखान्यात निवडून द्यावयाच्या संचालकांची संख्या 21 इतकी आहे. मुरगूड, बोरवडे, कागल, मौजे सांगाव व सेनापती कापशी या पाच गटांतून प्रत्येकी तीन संचालक असे 15 व संस्था गटातून एक, अनुसूचित जाती किंवा जमाती या गटातून एक, महिला दोन, इतर मागास प्रवर्गातून एक व भटक्या विमुक्त यामधून एक अशी एकूण 21 संचालक संख्या आहे. दि. 22 मे ते 26 मेअखेर उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत दाखल करता येणार आहेत. भरलेल्या उमेदवारी अर्जांची प्रसिद्धी ज्या त्या दिवशी दुपारी तीननंतर करण्यात येईल.
छाननी सोमवार, दि. 29 मे रोजी सकाळी 11 वाजता आहे. छाननीनंतरच्या वैध उमेदवारी अर्जांची प्रसिद्धी 30 मे रोजी सकाळी 11 वाजता होईल. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत 30 मे ते 13 जून अशी आहे. उमेदवारांची अंतिम यादी 14 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होईल. रविवार, दि. 25 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होईल. दरम्यान मतदानाचे स्थळ नंतर घोषित करण्यात येईल. मतमोजणी मंगळवार, दि. 27 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ही प्रक्रिया होईल. कागल-राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
दरम्यान, या कारखान्यासह बिद्री साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, निवडणुकीची चैन कारखान्यांना न परवडणारी आहे, असे वक्तव्य कारखान्याचे चेअरमन खासदार संजय मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले होते. दरम्यान, मंडलिक कारखाना बिनविरोधबाबत एक शिष्टमंडळही आ. हसन मुश्रीफ यांना भेटल्याचेही त्यांनी या मेळाव्यात सांगितले होते. कारखान्याची गेल्या वेळची निवडणूकदेखील बिनविरोध पार पडली होती.