Dudhganga Vedganga Sakhar Karkhana | राजकीय विरोधक प्रकाश आबिटकर आणि राहुल देसाई 'बिद्री'च्या निवडणुकीत एकत्र येणार काय! | पुढारी

Dudhganga Vedganga Sakhar Karkhana | राजकीय विरोधक प्रकाश आबिटकर आणि राहुल देसाई 'बिद्री'च्या निवडणुकीत एकत्र येणार काय!

मुदाळतिट्टा; प्रा.शाम पाटील : राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आहे. भाजप व शिंदेंची राज्यातील आघाडी बिद्री निवडणुकीमध्ये टिकणार काय? असा प्रश्न सर्वत्र चर्चेत आला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे संदर्भ वेगळे आहेत. येथे गटातटाला महत्व दिले जाते. कार्यकर्त्याला संधी देण्याच्या दृष्टिकोनातून व आपला गट शाबूत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपली राजकीय वाटचाल कायमस्वरूपी सुरू ठेवली जाते. बिद्रीच्या निवडणुकीत पुन्हा हे चित्र भुदरगडमधून समोर येईल हे स्पष्टपणे जाणवत आहे. कारण येथे राजकीय विरोधक असणारे आमदार प्रकाश आबिटकर व जिल्हा परिषदचे माजी सदस्य राहुल देसाई या निवडणुकीत एकत्र येणार काय? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. तर बिद्री बिनविरोधकाची हवा हवेतच विरणार असल्याचे चर्चा ही होताना दिसत आहे. (Dudhganga Vedganga Sakhar Karkhana)

बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर तालुक्यात चर्चा सुरू आहे. जर निवडणूक बिनविरोध झाली तर आपल्या गटाला योग्य सन्मान, योग्य जागा मिळणार काय? असा सवाल उभा राहिला आहे. अशातच पारंपरिक विरोधक म्हणून संबोधले जाणारे आमदार प्रकाश आबिटकर व युवा नेते राहुल देसाई हे या निवडणुकीत भाजप- शिंदे सरकार आघाडीमध्ये सहभागी होणार काय? या मार्गात जायला युवा नेते राहुल देसाई यांची वाट थोडी बिकटच दिसते. कारण बिद्रीच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये ते के. पी. यांच्यासोबतच राहिले आहेत व आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात ते यशस्वी झाले आहेत. याही वेळी ते हीच भूमिका स्वीकारतील अशी चर्चा कार्यकर्त्यात होताना दिसून येत आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांच्याशी चर्चा करून युती केली होती. आमदार आबिटकर यांनी चंद्रकांत पाटील यांना हिंमत असेल तर तुम्हीच आखाड्यात या असे खुले आव्हान गारगोटी येथील सभेत दिले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी के. पी. यांच्याशी संधान बांधून आबिटकर यांना खुला विरोध केला होता. त्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांना सत्तेत संधी मिळाली होती. त्यामध्ये राहुल देसाई यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. गेले पाच वर्षे बिद्रीचे उपाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना मानणाऱ्या खोराटे यांच्याकडे राहिले होते. पण सध्या राज्यातील सतेची समिकरणे वेगळी आहेत. त्याचा परिणाम येथे होईल का? असा प्रश्न ही निर्माण झाला आहे.

पण सध्याचे राजकीय परिस्थिती वेगळी आहे. ‌काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना व अन्य घटक पक्ष राज्यात महाविकास आघाडी करून सर्वच निवडणुका लढवण्याच्या मानसिक तयारी असल्याचे दिसते. याला बिद्री ही अपवाद राहणार नाही. महाविकास आघाडी आकाराला येईल असे दिसते. आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आघाडी अस्तित्वात येईल असे स्पष्ट दिसते.

राहुल देसाई हे मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांचे नेतृत्व मानतात. त्यांच्या सल्ल्यानेच ते आपली राजकीय वाटचाल करीत आहेत. सध्या भुदरगड तालुक्यात भाजपचे नाथाजी पाटील, अखिलेश कांदळकर हे युवा नेते कार्यरत आहेत. राज्यस्तरीय नेतृत्वाचा मान ठेवून ते कार्यरत आहेत. पण आगामी बिद्रीच्या निवडणुकीत काय होणार? याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. पण मागील निवडणुकीचा अनुभव पाहता राहूल देसाई सत्तारुढ आघाडीसोबत राहतील असे चित्र आता तरी दिसत आहे. नुकत्याच झालेल्या भुदरगड तालुका संघाच्या निवडणुकीत सर्वच नेते एकत्र येऊन लढले होते. त्यांच्या आघाडीचा विजयी झाला. पण बिद्रीची निवडणूक वेगळी असल्याकारणाने या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार? याचं चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. बिद्रीच्या निवडणुकीसंदर्भात ‘अजून पुला खालुन बरेच पाणी वाहून जायचं आहे’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

हेही वाचा : 

Back to top button