करणीतून ‘त्या’ कुटुंबातील सार्‍यांना संपविण्याचा माथेफिरूचा होता डाव! | पुढारी

करणीतून ‘त्या’ कुटुंबातील सार्‍यांना संपविण्याचा माथेफिरूचा होता डाव!

कोल्हापूर, दिलीप भिसे : ‘करणी’ च्या संशयाने पछाडलेल्या निखिलचा स्वभाव तापट बनला होता. मुलतानी कुटुंबामुळेच सार्‍यांना मनस्ताप सोसावा लागत आहे. असा त्याचा समज झाला होता. मुलतानी कुटुंबातील व्यक्ती समोर आली की, तळपायाची आग मस्तकाला भिडायची… करणी करणार्‍यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय ‘साडेसाती’ संपणार नाही, अशी त्याने खूणगाठ बांधली होती. एकाचवेळी सारे कुटुंब संपविण्याचा त्याचा इरादा होता. निपाणीतून धारदार तलवारही खरेदी केली होती.

निखिल गवळी पंधरवड्यापासून संधीच्या शोधात होता. त्याच्या रूपाने आझाद मुलतानीसह त्यांच्या कुटुंबांवर जणू काळ आला होता. मंगळवारी (दि.16) रात्री साडेआठला मुलतानी यांच्या घराचा दरवाजा उघडलेला दिसला अन् निखिलच्या अंगात संचारले… स्वत:च्या घराकडे पळत गेला… हातात धारदार तलवार घेऊन अवघ्या काही सेकंदात मुलतानी यांच्या घराच्या दिशेने पळत सुटला… दरवाजा जोरात ढकलला. माझ्या घरावर करणी करता काय? असा सवाल करीत तुम्हा सार्‍याना संपवितो… असे बरळत त्याने जेवणाच्या ताटावर बसलेल्या मुलतानी यांच्या सून अफसाना (वय 22) यांच्यावर हल्ला चढविला.

डोळ्यादेखत सुनेवर हल्ला झाल्याने सासरे आझाद यांनी माथेफिरूला रोखण्याचा प्रयत्न केला. सुनेला वाचविण्याच्या प्रयत्नात सासर्‍याने सारे वार स्वत:च्या अंगावर झेलले… पाठीमागून तलवारीने झालेल्या खोलवर हल्ल्यामुळे आझाद रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या अफसाना रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होत्या. आझाद यांची पत्नी रेहाना (वय 45), सून आयेशा डोळ्यादेखत झालेल्या घटनेने भेदरलेल्या होत्या. त्याही स्थितीत त्यांनी आरडा- ओरडा केला. आवाजामुळे शेजारील नागरिकांची क्षणार्धात गर्दी झाल्यानंतर मारेकरी रक्ताळलेल्या तलवारीसह अंधारातून पसार झाला…

करणीचा संशय आणि संतापाची लाट

दाटीवाटीने लोकवस्ती आणि सतत गजबजलेल्या टेंबलाई नाका चौकात मंगळवारी अंगावर काटा आणणारे थरारनाट्य घडले. घरावर करणी केल्याच्या संशयातून याच परिसरात राहणार्‍या निखिल गवळी (वय 22) याने आझाद मुलतानी यांच्या घरात घुसून जेवणाच्या ताटावर बसलेल्या कुटुंबीयांवर धारदार तलवारीने जीवघेणा हल्ला केला. त्यात सेट्रिंग कामगार असलेले कुटुंबप्रमुख आझाद यांचा मृत्यू झाला. तर त्यांची सून अफसाना गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. करणीच्या संशयातून निष्पाप कुटुंबांवर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ अन दहशत..!

हल्लेखोर निखिल टेम्पोचालक आहे. दोन- अडीच वर्षांपासून व्यसनाच्या आहारी गेला आहे. सायंकाळनंतर गांजा आणि मद्यसेवनामुळे त्याचे स्वत:वरील नियंत्रण सुटलेले असते. रोज रात्री आठ ते साडेआठ याकाळात स्वत:च्या घराकडे येताना गल्लीतील तसेच शेजारी राहणार्‍यांना शिवीगाळ करणे, अंगावर धाऊन जाणे, दुसर्‍यांच्या दारात बुलेट पार्क करणे, असे त्याचे कारनामे सुरू असतात. त्याच्या रोजच्या त्रासाला गल्लीतील सारेच कंटाळलेले…वादावादी नको म्हणून तो घराकडे जात असताना प्रत्येकजण स्वत:च्या घराचे दरवाजे बंद करून घेत. याप्रकारामुळे तो सार्‍यांनाच शिवीगाळ करीत असे.

मुलतानी कुटुंबाच्या घराची दोन-तीन वेळा केली होती रेकी!

तीन आठवड्यापूर्वी निखिलने निपाणी गाठले. धारदार तलवार खरेदी केली. याच तलवारीने कुटुंबाला संपविण्याचा त्याचा इरादा नक्की झाला. मुलतानी कुटुंबातील सारी मंडळी घरात एकत्रित येण्याची तो संधी शोधत होता. तत्पूर्वी त्याने दोन-तीनवेळा रेकी केली होती. मंगळवारी आझाद, त्याची पत्नी आणि दोन सुना घरात होत्या. तर दोन्ही मुले कामावरून अद्याप घराकडे परतलेले नसल्याने हल्ल्याची हीच वेळ असल्याची त्याची खात्री झाली.

तलवारीसह घरात घुसला !

रात्री 8 वाजता घराकडे जाताने त्याने मुलतानी यांच्या घराकडे डोकावले असता, कुटुंबाने घराचा दरवाजा पटकन बंद केला. त्यामुळे तो आणखी भडकला. निखिल स्वत:च्या घराकडे गेला. आई, वडिल आणि आजीशी त्याने गप्पागोष्टी केल्या. त्यानंतर तो घराबाहेर पडला. मुलतानी यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास येताच तो पुन्हा स्व:ताच्या घरी गेला. तेथून तलवारीसह मुलतानी कुटुंबियांच्या घरात घुसून जिवघेणी हल्ला केला.

संशयिताकडून गुन्ह्यासह कटाची कबुली

टेंबलाई नाका परिसरात घडलेले थरारनाट्य शहर, जिल्ह्यात हा चर्चेचा विषय आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी मंगळवारी रात्री स्वत: घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली आहे. निखिल स्वत: राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर झाल्याने देसाई यांनी स्वत: संशयितांकडे चौकशी केली. संशयिताने गुन्ह्याची कबुली देताना मुलतानी कुटुंबाला कायमचा धडा शिकविण्यासाठी रचलेल्या कटाची माहिती देताच वरिष्ठ पोलिस अधिकारीही अवाक् झाले. तपासाधिकारीही कमालीचे हादरले!

Back to top button