Kolhapur : कोल्हापूरातील 'या' गावात धार्मिक प्रथेनुसार गाव बंद, व्यवहार ठप्प; जाणून घ्या अनोखी प्रथा | पुढारी

Kolhapur : कोल्हापूरातील 'या' गावात धार्मिक प्रथेनुसार गाव बंद, व्यवहार ठप्प; जाणून घ्या अनोखी प्रथा

माद्याळ; पुढारी वृत्तसेवा : वडगाव (ता.कागल) ग्रामस्थांनी बाहेर गावच्या नागरिकांना गावात प्रवेश बंदी करत दोन दिवसांचा गावबंद जाहीर केला आहे. तसेच गुरुवारी (दि. १८) आणि शुक्रवारी (दि. १९) दोन दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

गावच्या चोहोबाजूंच्या वेशीवर लॉकडाऊन फलक लावले असून, सोशल मिडीया माध्यमातून आसपासचे नागरिक व पाहुण्यांना अटकाव केला आहे. गावच्या धार्मिक प्रथेनुसार बागेतील गुप्त देवाची यात्रा गुपचुप साजरी करणार असल्याने गावकऱ्यांनी लॉकडाऊन केल्याचे सांगितले. या कालावधीत गावकरी बाहेर जाणार नाहीत. तर बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करणार नाही. याची खबरदारी घेण्यात आली आहे. कडकडीत बंद पाळत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात गावोगावी लॉकडाऊन करण्यात आले. गावबंदी करण्यात आली. नागरिकांना लॉकडाऊन हा शब्द परवलीचा झाला. कालांतराने कोरोना संसर्ग संपल्यानंतर नागरिकांचे व्यवहार सुरळीत झाले. या पार्श्वभूमीवर वडगाव ग्रामस्थांनी पुन्हा एकदा गावात दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यावेळी हा बंद कोरोना संसर्गसाठी नाही तर गावातील परंपरागत धार्मिक कार्य सुरु आहे. या कार्यात इतरांची बाधा येऊ नये. म्हणून गाव बंदी करण्यात आली आहे. मात्र या कृतीने परिसरातील नागरिकांना कोरोना काळ पुन्हा एकदा आठवला. दरम्यान विचित्र प्रथेमुळे नोकरदार, विद्यार्थी व व्यापारदार यांची मोठी अडचण झाली आहे.

Back to top button