कोल्हापूर : रूईकर कॉलनीत बंगला फोडून 20 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास

File Photo
File Photo

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  रूईकर कॉलनीतील सूरज हिराप्पा सुतार यांच्या बंगल्याची खिडकीच उचकटून काढली आणि बंगल्यात प्रवेश करून सुमारे 8 लाख 18 हजार रुपये किमतीच्या 20 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 हजारांची रोकड लंपास केली. सुतार कुटुंबीय गाढ झोपेत असताना चोरट्यांनी बिनधास्तपणे हे कृत्य केले.

बंद घराचे कडी-कोयंडे उचकटून चोरी, घरफोडीचे सत्र सुरू असतानाच मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी लोक घरात असतानाही चोरी करण्याचे धाडस केले. घरात चोर आले, चोरी केली तरीदेखील सुतार कुटुंबीयांना याचा पत्ता नव्हता. सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी शाहूपुरी पोलिसांना दिली. चोरट्यांच्या उच्छादामुळे शहर आणि परिसरात भीतीचे वातावरण असून, चोरट्यांची दहशत वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

रूईकर कॉलनी या उच्चभ्रूंच्या वस्तीलाच चोरट्यांनी बुधवारी लक्ष्य केले. निरंजन वायचळ यांचा हा बंगला आहे. या बंगल्याला चार खोल्या आहेत. या बंगल्यात सूरज सुतार हे पत्नी आणि दोन मुलांसह भाड्याने राहतात. मंगळवारी मध्यरात्री ते बेडरूममध्ये झोपले असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बंगल्याच्या खिडकीचे ग्रीलच उचकटून काढले आणि चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. चोरट्यांचा पहाटे चार वाजेपर्यंत बंगल्यात वावर असल्याचे सीसीटीव्हीवरून स्पष्ट झाले आहे. त्यांनी कपाटातील सर्व साहित्य विस्कटून टाकले. यामध्ये त्यांना रोख 15 हजार रुपये व 20 तोळे सोन्याचे दागिने मिळाले. चोरट्यांनी ही रोकड आणि दागिनेही लंपास केले. जाताना त्यांनी डायनिंग टेबलवर असलेली दुचाकीची किल्ली घेतली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते बंगल्यातून आरामात बाहेर पडले. सुतार यांच्याच अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे गेल्याचेही सीसीटीव्हीत आढळून आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news