टेंबलाई नाका खून; संशयितास 6 दिवस कोठडी

टेंबलाई नाका खून; संशयितास 6 दिवस कोठडी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  करणी केल्याच्या संशयावरून टेंबलाई नाका येथे घरात घुसून आझाद मकबूल मुलतानी यांचा खून केल्याप्रकरणी अटकेत असणार्‍या निखिल गवळी याला 6 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पोलिसांनी बुधवारी गवळीला न्यायालयासमोर हजर केले होते. दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अफसाना मुलतानी यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने हादरून गेलेल मुलतानी कुटुंबीय अद्याप सावरले नाहीत. दहशत आणि भीतीच्या वातावरणातच बुधवारी आझाद यांचा मृतदेह दफन करण्यात आला.

शहरातील टेंबलाई नाका झोपडपट्टी येथे मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडलेल्या खुनाच्या या थरारक घटनेची भीती दुसर्‍या दिवशीही परिसरात दिसून येत होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सकाळपासूनच परिसरात कडक बंंदोबस्त तैनात केला होता. दिवसभर हा बंदोबस्त होता.

आझाद मुलतानी हे परिसरात सर्वांना परिचित होते. आपले काम भले आणि आपण भले, असा त्यांचा स्वभाव होता. परंतु अशा प्रकारचा प्रसंग त्यांच्यावर कसा काय उद्भवला, अशी चर्चा परिसरात सुरू होती. मुलतानी कुटुंबीयांवरील हल्ल्याने परिसरच हादरून गेला असून, प्रत्येक कोपर्‍याकोपर्‍यावर लोक गटागटाने चर्चा करताना आढळून येत होते. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे करत आहेत.

परिसर का होतोय अशांत?

एरवी शांत असणार्‍या टेंबलाई नाका परिसरात अलीकडे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने लोकांत चिंतेचे वातावरण आहे. काही वर्षांपूर्वी याच परिसरात दुहेरी खुनाची घटनादेखील घडली होती. मंगळवारच्या घटनेनंतर अनेकांच्या अंगावर शहारे येत आहेत. भरल्या ताटावर जेवायला बसलेल्या आझाद मुलतानी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या घडणार्‍या घटनांच्या मुळाशी जाऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षाही नागरिकांच्यातून व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news