कोल्हापूर : लाल मिरचीचा तोरा उतरला | पुढारी

कोल्हापूर : लाल मिरचीचा तोरा उतरला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वर्षभराची बेगमीची लाल चटणी करण्यासाठी घराघरांत अखेरची लगबग सुरू आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून सतत वाढणारे मिरचीचे दर आता काहीसे स्थिरावल्याने मिरची खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीच्या दरात २५ टक्क्यांची दरवाढ झाली होती, त्यामुळे भर उन्हात सर्वसामान्य लोकांना लाल तिखटाचा उसका सोसवेना झाला होता. मात्र, आता लाल मिरचीचा तोरा १०० ते २०० रुपयांनी उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.

मागील हंगामादरम्यान अवकाळी पाऊस आणि पिकांवरील रोगांमुळे लाल मिरची उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी, दर्जेदार वाणांची आवक मागणीच्या तुलनेत घटल्याने मिरचीच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली आहे. सततच्या दरवाढीमुळे अनेक ग्राहक दर उतरण्याच्या प्रतीक्षेत होते. अनेकांनी या सिझनमधील चटणीचा घाट दिवाळीकडे वळवला आहे.

मिरचीच्या बाजारपेठेत ब्याडगी, गुंटूर, लवंगी या वाणांना ग्राहकांतून मागणी आहे. सर्वसाधारणपणे ३०० ते २ हजारांच्या पुढे विविध वाणांच्या मिरच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आधीच महागाईने बेजार झाले असताना मिरच्यांच्या दरवाढीने गृहिणींना घाम फुटतो आहे.

मे महिन्यात प्रतिकिलो मिरच्यांचे दर असे…

संकेश्वरी : १५०० ते २५०० रुपये
काश्मिरी : ९०० ते ११०० रुपये
केडीएल ब्याडगी : ८०० ते ११०० रुपये सिजेंटा : ५०० ते ७५० रुपये
तेजा : ३५० ते ४२५ रुपये
देशी : ३०० ते ५२० रुपये
गुंटूर : ३५० ते ४००

Back to top button