महागाई मुळे मोडले कंबरडे; सामान्यांचे जगणे मुश्कील

महागाई मुळे मोडले कंबरडे; सामान्यांचे जगणे मुश्कील

'बाकी कुछ बचा तो महंगाई मार गयी.. महंगाई मार गयी…' हे 'रोटी, कपडा और मकान' चित्रपटातील गीत आजच्या महागाईला तंतोतंत लागू होत असल्याचे चित्र आहे. पालेभाज्यांसह धान्य, डाळी, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर हे महागाई वाढण्याला कारणीभूत ठरत असून गतवर्षीच्या तुलनेत महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या आवाक्याबाहेर चालल्या आहेत. घाऊक बाजारात महागाईचा आलेख वाढत चालला आहे. घरगुती गॅस सिलिंडर 900 रुपये, पेट्रोल 111 प्रतिलिटर आता डिझेलनेही शंभरी ओलांडली आहे. गहू, तांदूळ, भाज्या, कांदे-बटाटे यांच्या किमतीत वाढ होत चालली असून ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

कोरोनामुळे देशातील जनतेला लॉकडाऊनला सामोरे जावे लागले होते. आता कुठे जनजीवन सुरळीत सुरू असताना इंधन दरवाढीने लोकांच्या तोंडचा घास पळवला आहे. केंद्र सरकारने आता खाद्य तेलाचे दर सहा ते सात रुपयांनी कमी केले आहेत. तेल बियांचे उत्पादन घटल्याने परदेशातून तेलाची आयात करावी लागल्याने तेलाच्या किमती या 170 त 180 रुपये लिटरवर गेल्या होत्या. गतवर्षी शेंगतेल, सरकी तेलाचे दर हे 130 ते 140 रुपये प्रतिलिटर होते.

वाहतूक खर्चात वाढ

जीवनावश्यक मालाची वाहतूकही ट्रकमधून होते. ट्रकसाठी इंधन म्हणून डिझेलचा वापर होतो. मालाची वाहतूक करताना किलोमीटर व डिझेल दरावर भाड्याचा दर निश्चित होतो. त्यामुळे घाऊक बाजारात मालाचे दर वाढतात. किरकोळ दुकानदारापर्यंत हा माल पोहोचतो तेव्हा त्यात पाच ते दहा रुपयांनी वाढ होते.

दिवाळी सणात महागाईचा भडका

इंधन दरात वाढ झाली की, जीवनावश्यक वस्तूंवर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होतो. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. केंद्रीय वाणिज्य विभागाने मार्च महिन्यात महागाई दर 7.39 टक्के इतका होता. एप्रिलमध्ये हा महागाई दर 10.49 टक्क्यांवर पोहोचला. महागाई दरात एका महिन्यात जवळपास 3.1 टक्क्यांची वाढ झाली आहे.

महागाईचा दर वाढला

महागाईचा दर ऑगस्ट महिन्यात 5.30 टक्क्यांवर राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ऑगस्टच्या महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर हा 5.59 टक्के इतका होता. जुलै महिन्याच्या तुलनेत 0.29 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून येतेे. ऑगस्ट 2021 मध्ये ग्रामीण क्षेत्रातील दर 5.28 टक्के होता. शहरी भागातील महागाईचा दर 5.32 टक्के होता.

गतवर्षी पेट्रोल 88, डिझेल 76 रुपये

इंधन दरावर केंद्र सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने ऑईल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल दरात वाढ होत आहे. पेट्रोलने चार महिन्यांपूर्वीच शंभरी गाठली आहे. डिझेलचा प्रति लिटर दर शंभर रुपये झाला आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल 88 रुपये प्रतिलिटर होते, तर डिझेल 76 रुपये प्रतिलिटर होते.

गॅसच्या दरात वाढ

घरगुती गॅस दरात वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेल्या वर्षी घरगुती सिलिंडर दर हा 820 रुपये होता. त्यात आता वाढ होऊन तो 900 रुपयांवर गेला आहे. दर असेच वाढत गेले, तर घरगुती गॅस सिलिंडरचे दर 1 हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. त्यातच सबसिडी नसल्यामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news