चला पर्यटनाला : धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनात अव्वल असलेले खिद्रापूर | पुढारी

चला पर्यटनाला : धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनात अव्वल असलेले खिद्रापूर

कुरुंदवाड; जमीर पठाण :  कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्यशैलीचे जगप्रसिद्ध दगडी महादेव मंदिर, कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरलेल्या कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम मंदिरातच स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आणि कुरुंदवाडचा ऐतिहासिक कृष्णाघाट असा हा ‘गोल्डन ट्रँगल’ आहे. मनसोक्त आस्वाद घ्यावा, असे हे पर्यटनस्थळ आहे.

नृसिंहवाडी लगतच मंदिरातून द़ृष्टीस पडणारे कुरुंदवाडचे सौंदर्य म्हणून ओळखल्या जाणारे पटवर्धन संस्थान सरकारने 1799 साली कृष्णाघाट या टोलेजंग निसर्ग सौंदर्याची दगडी शिल्पात उभारणी केली आहे. याच घाटावर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. याच घाटावर ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ‘मंगल पांडे’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या निधनानंतर त्यांच्या अस्थिंचे विसर्जन येथे केले.

शिरोळ तालुक्यात खिद्रापूर या गावी प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्य- शैलीचे दगडी महादेव मंदिर वसलेले आहे. ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानीने परिपूर्ण आहे. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘विटी-दांडू’ या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण तर ‘शिव भोला भंडारी’ या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाले आहे. या मंदिराला भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने 2 जानेवारी, इ. स. 1954 साली महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

नृसिंंहवाडीला कसे याल

राज्य परिवहनच्या खासगी प्रवासी बस, खासगी बस कोल्हापूर येथे येतात. कोल्हापुरातून नृसिंहवाडी 70 कि.मी. तर खिद्रापूर 22 कि.मी. आहे.

रेल्वे मार्ग : मिरज जंक्शन आणि जयसिंगपूर येथे थेट रेल्वेगाड्या येतात मिरज जंक्शन येथून नृसिंहवाडी 19 किमी, खिद्रापूर 40 कि.मी. जयसिंगपूर स्टेशन येथून नृसिंहवाडी 13 कि.मी., खिद्रापूर
34 कि.मी. अंतर आहे.

राहण्याची सोय

नृसिंहवाडी येथे यात्री निवास आणि अन्य राहण्यासाठी व जेवणासाठीचे ठिकाणे आहेत. खिद्रापूर येथे येणारे पर्यटक नृसिंहवाडी किंवा जयसिंगपूर, इचलकरंजी या ठिकाणी मुक्काम करू शकतात.

Back to top button