

कोल्हापूर; सुनील कदम : देशातील सोने तारण कर्ज व्यवहारांवर अजूनही खासगी सावकारांचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. देशातील सावकारांनी ग्राहकांना सोन्याच्या तारणावर जवळपास दीड लाख कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय बँका आणि नॉन बँकिंग कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षात 80 हजार कोटींहून अधिक रकमेचे सोने तारण कर्ज वाटप केले आहे.
देशातील बहुतांश शासकीय आणि सहकारी बँका, पतसंस्था सोने तारणावर कर्ज देतात. बँकांचे व्याजाचे दरही 7 ते 9.15 टक्क्यांच्या दरम्यान आहेत; मात्र बँकांची वेळखाऊ प्रक्रिया, वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता आणि तातडीची गरज या कारणांमुळे सोने तारण कर्जदार बँका-पतसंस्थांपेक्षा खासगी सावकाराला प्राधान्य देतात. खासगी सावकारांकडे दागिन्याची केवळ खरेदी पावती दाखवून कर्ज उपलब्ध होते. परिणामी देशातील सावकारांनी तब्बल दीड लाख कोटी रुपयांचे सोनेतारण कर्जवाटप केले आहे. सोनेतारण कर्जाचा सावकारांचा दर हा बँका-पतसंस्थांच्या जवळपास दुप्पट-तिप्पट असतानाही कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी तातडीने कर्ज उपलब्ध होत असल्यामुळे कर्जदार खासगी सावकारांना प्राधान्य देताना दिसतात.
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, नोकर्या गेल्या, उपजीविकेची साधने हरविली, त्यामुळे तातडीची निकड म्हणून अनेकांनी सोनेतारण कर्जाचा आधार घेतला. कोरोनापूर्वी 2020 साली देशातील बँका-पतसंस्थांनी 46 हजार 791 कोटी रुपयांचे सोनेतारण कर्जवाटप केले होते. कोरोनाच्या उद्रेकानंतर 2022 च्या अखेरीस हाच सोनेतारण कर्जाचा आकडा जवळपास दुपटीवर म्हणजे 80 हजार 617 कोटी रुपयांवर गेला आहे. या कर्जामध्ये नॉन-बँकिंग कंपन्यांचा वाटा बँका पतसंस्थांपेक्षा मोठा आहे. खास सोने तारण कर्जासाठी म्हणून काही नॉन-बँकिंग कंपन्यांनी प्रमुख शहरे आणि गावागावांमध्ये आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. सोनेतारण कर्जाच्या बाबतीत काही नामवंत नॉन बँकिंग कंपन्यांनी ग्राहकांचा चांगलाच विश्वास प्राप्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशात सोने तारणावर जेवढे कर्ज दिले गेले आहे, त्यापैकी 55 टक्के कर्ज हे ग्रामीण भागातील जनतेचे आहे. त्याचप्रमाणे सोने तारणावर कर्ज घेणार्यांपैकी 72 टक्के कर्जदार हे शेतकरी परिवारातील असल्याचेही आढळून आले आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला बहुतांश शेतकर्यांकडून हमखास सोनेतारण कर्ज उचलले जाते आणि सुगी सुरू झाली की तातडीने या कर्जाची परतफेड केली जाते. मुला-मुलींच्या लग्नाच्यावेळी, घरबांधणी करताना किंवा अन्य स्वरूपाच्या आर्थिक अडचणीच्यावेळी सोनेतारण कर्ज उचलण्याचे प्रमाण ग्रामीण भागात सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
(संदर्भ : आरबीआय सोनेतारण कर्जवाटप सांख्यिकी)
अलीकडील काही वर्षांत बँकांकडे बनावट सोने तारण ठेवून बँकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले दिसत आहेत. प्रामुख्याने सहकारी बँकांच्या बाबतीत हे प्रकार आढळून येतात. सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक अशा काही जिल्ह्यांमध्ये बनावट सोने तारण ठेवून बँकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची कित्येक प्रकरणे अलीकडे उघडकीस आली आहेत. अर्थात या प्रकारच्या बहुतांश प्रकरणांमध्ये बँकेशी संबंधित यंत्रणाही त्यामध्ये सामील असल्याचेही चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात सोनेतारण कर्जवाटप करताना बँकांना अधिक सावध राहण्याची गरज आहे.