कोल्हापूर : चोर्‍या ढीगभर… तपास शून्यावर! | पुढारी

कोल्हापूर : चोर्‍या ढीगभर... तपास शून्यावर!

कोल्हापूर, दिलीप भिसे : आंतरराज्य गुन्हेगारी टोळ्यांनी शहर, उपनगरे, ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात चोरी, घरफोडीचे बेधडक सत्र सुरू आहे. आयुष्यभर गाठीला गाठ बांधून केलेल्या पुंजीवर चोरटे डल्ला मारत असतानाही पोलिस यंत्रणा ढिम्म आहे. बंद बंगले हेरायचे अन् रात्रीत चोर्‍या करायच्या असा चोरट्यांचा फंडा सुरू आहे. चोरी, घरफोडीचे ढीगभर गुन्हे होत असतानाही एकाही गुन्ह्याचा यंत्रणांना छडा लागत नाही. चोर्‍या ढीगभर अन् तपास शून्यावर अशीच काहीशी स्थिती जिल्ह्यात आहे. चोरट्यांच्या कारनाम्याने करवीरसह इचलकरंजी परिसरात चिंतेचे सावट आहे.

कुख्यात टोळ्यांचा शिरकाव; पण सुगावा नाही

शहर, उपनगरांसह ग्रामीण दोन-अडीच महिन्यांच्या काळात चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकसह अन्य राज्यांतील टोळ्यांचा जिल्ह्यात शिरकाव होऊनही पोलिस यंत्रणांना त्याचे गांभीर्य नाही. शहरात जुना राजवाडा, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी एव्हाना करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडीचे सत्र सुरू असतानाही चोरट्यांचा छडा लागत नाही, याचेच आश्चर्य वाटते. रात्र-दिवस नाकाबंदी, वाहन तपासणी, पेट्रोलिंगसंदर्भात वरिष्ठांचे फर्मान असतानाही चोरी, घरफोडीचे सत्र सुरूच आहे.

आलिशान बंगले चोरट्यांच्या टार्गेटवर

कोल्हापूर शहर, उपनगरांसह करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेषत: उपनगरे व ग्रामीण परिसरात अलीकडच्या काळात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जरगनगर, आर. के.नगर. पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, कंदलगाव, बालिंगा, फुलेवाडी परिसरातील अनेक आलिशान व बंद बगल्यांना टार्गेट करीत चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू, रोख रकमांवर डल्ला मारल्याच्या घटना आहेत. गतवर्षात ही आकडेवारी धक्कादायक होती. चोरीचे गुन्हे दाखल होतात; पण एकाही गुन्ह्याचा करवीर पोलिसांना छडा लागलेला नाही. गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी, कर्मचारी नेमके काय करतात, हे त्यांचे वरिष्ठाधिकारीच जाणो..!

बसस्थानक परिसरात चोरट्यांची दहशत

सराईत चोरट्यांचा खुलेआम वावर व दहशतीमुळे मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांच्या द़ृष्टीने असुरक्षित बनले आहे. दोन दिवसांपूर्वी इस्लामपूर येथील प्रवासी महिलेचे अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी हातोहात लंपास केले. सिट मिळण्यासाठी खिडकीतून बॅग टाकण्यात आली. मिनीट-दोन मिनिटांत सिटवर पोहोचण्यापूर्वीच चोरट्यांनी क्षणार्धात बॅग पळविली. किती हा धक्कादायक प्रकार..!

बसस्थानक ठरतेय असुरक्षित!

शाहूपुरी पोलिसांना अशा घटनांची फिकीर नाही. वर्ष-दीड वर्षात बसस्थानक आवारातील चोरीच्या डझनभर घटना घडलेल्या असताना एकाही गुन्ह्याचा पोलिसांना छडा लागला नाही की चोरट्यांना बेड्या ठोकण्यात यश आले नाही, ही वस्तुस्थिती वरिष्ठ अधिकारीही नाकारू शकत नाहीत. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक सद्यस्थितीत असुरक्षित बनले आहे, हे मात्र नक्की!

Back to top button