कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष | पुढारी

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : संभाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाहूपुरी, शिवाजी पेठ, संभाजीनगर, राजारामपुरी, बिंदू चौक, मंगळवार पेठ, कसबा बावडा, जरगनगर याठिकाणी कार्यक्रम होत आहेत. रविवारी शहरातून मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे.

शाहूपुरी तिसरी गल्ली येथील मास्टर विनायक चौकात बनविण्यात आलेल्या काल्पनिक किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आली. संभाजी बि—गेडच्या वतीने दसरा चौकात डिजिटल पोस्टर उभारण्यात आले. संयुक्त राजारामपुरी संभाजी महाराज जयंती समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या 11 फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोल्हापूर मर्दानी खेळ संस्थेच्या वतीने महाराष्ट्र हायस्कूल येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

मंगळवार पेठ, बेलबाग येथील अर्जुन मित्र मंडळातर्फे रविवारी सकाळी छत्रपतींच्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा, 11 वाजता शंभूराजे जन्मकाळ सोहळा, सायंकाळी चित्रकला स्पर्धा, सोमवारी (दि. 15) सायंकाळी संगीत खुर्ची, मंगळवारी (दि. 16) सकाळी 9 ते 1 या वेळेत आरोग्य शिबिर, सायंकाळी 6 वाजता रांगोळी स्पर्धा, व्याख्यान व स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे.

राजे संभाजी तरुण मंडळातर्फे मिरवणूक

शिवाजी पेठेतील राजे संभाजी तरुण मंडळाच्या इमारतीत रविवारी संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून कायमस्वरूपी पुतळा बसविला जाणार आहे. बिनखांबी गणेश मंदिर चौकातून रविवारी सायंकाळी 5 वाजता मिरवणुकीने हा पुतळा मंडळामध्ये आणण्यात येणार आहे.

भरगच्च कार्यक्रम

मर्दानी कला विशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 300 शिबिरार्थींचा सहभाग असणारी मिरवणूक रविवारी (दि. 14) सकाळी 9.30 वाजता पापाची तिकटी येथून सुरू होईल. सहभागी शिबिरार्थी लाठीकाठी, लेझीम, दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके या मिरवणुकीत सादर करणार आहेत. संयुक्त शाहूपुरी, संयुक्त राजारामपुरी, संयुक्त संभाजीनगर जयंती समितीच्या वतीनेही मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे.

महानाट्य, ऐतिहासिक चित्रपटांनी जागवला इतिहास

संयुक्त शाहूपुरी संभाजी महाराज जयंती समितीच्या वतीने सायंकाळी मर्दानी कलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावरील महानाट्याचे सादरीकरण झाले. शंभूराजेंचे बालपण, स्वराज्य रक्षणाची रणनीती, युद्ध कौशल्य, राज्याभिषेक या प्रसंगांनी इतिहास जागृत करण्यात आला.

संयुक्त राजारामपुरीतर्फे शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये 57 तरुणांनी रक्तदान केले; तर रात्री इतिहासावर आधारित ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ हा चित्रपट पाहण्यासाठी राजारामपुरी 11 वी गल्ली येथे आबालवृद्धांनी गर्दी केली होती. संभाजीनगर मंडळातर्फेही रात्री ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात आला.

Back to top button