वाघ सोडून 374 वन्य प्राण्यांचे दर्शन | पुढारी

वाघ सोडून 374 वन्य प्राण्यांचे दर्शन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणनेत 374 वन्य प्राण्यांचे दर्शन झाले. बौद्ध पौर्णिमेदिवशी झालेल्या प्राणी गणनेची आकडेवारी समोर आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अद्याप वाघ नसले तरी आठ स्थलांतरित वाघांचा वावर असतो. या प्राणी गणनेदरम्यान मात्र त्यांचे अस्तित्व आढळले नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचेही निरीक्षण समोर आले आहे. वन विभागाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना, बामणोली, चांदोली, ढेबेवाडी आणि हेळवाक या वन परिक्षेत्रांतील जंगलातील 60 मचाणांवर बसून ही प्राणी गणना झाली. यावेळी 20 अस्वलांचा तर 3 बिबट्यांचा वावर आढळून आला. या जंगलात 18 सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे तसेच 10 वन्य पक्षी प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले.

दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला प्राणी गणना होते. याकरिता निसर्गानुभव कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये नागरिकांनाही आगाऊ नोंदणी करून सहभागी होता येते. यावर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी यांबरोबरच नाशिक, पुणे, मुंबई येथूनही निसर्गप्रेमींनी हजेरी लावली होती. नोंदीनुसार त्यांना 60 मचाणांवर एकूण 374 वन्य प्राण्यांचे दर्शन घडले.

…असा आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

5 जानेवारी 2010 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ हे 1165.57 चौ. कि.मी. आहे. व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांत येतो. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव आहे. 15 नद्यांचा उगम या जंगलातून होतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले ‘जागतिक नैसर्गिक वारसास्थळ’ आहे.

गवा, रानडुक्कर, अस्वलांची संख्या अधिक

बिबट्या 3, गवा 115, सांबर 10, चितळ 4, रानडुक्कर 103, भेकर 15, अस्वल 20, रानकुत्रा 5, उदमांजर 4, साळींदर 3, शेकरू 14 आदी प्राण्यांचा समावेश आहे. यासह गगेळा, वानर, माकड, मुंगुस, वटवाघुळ, रानउंदीर,ससा या प्राण्यांसह घार, चकोत्री, रानकोंबडा, धनेश, घुबड, शिक्रा, बटेर, मोर, सर्पगरूड आदी 57 पक्ष्यांचेही दर्शन घडले

Back to top button