जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी टार्गेट जून; आ. सतेज पाटील यांची सूचना

जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी टार्गेट जून; आ. सतेज पाटील यांची सूचना

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी धरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असलेली इंटेक वेल, इन्स्पेक्शन वेल 1 व 2 ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा. त्यानंतर तत्काळ कॉपर डॅम काढून घ्या. कोणत्याही परिस्थितीत जूनमध्ये धरणातील पाणी जॅकवेलमध्ये पडायला पाहिजे, हे टार्गेट ठेवा; मगच उर्वरित कामे व फिनिशिंग करून संपूर्ण चाचणी घ्या, अशा सूचना आ. सतेज पाटील यांनी ठेकेदार कंपनी आणि युनिटी कन्सल्टंट कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला थेट पाईपलाईन योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी 488 कोटींची योजना राबविण्यात येत आहे. योजना पूर्ण करण्यासाठी धरण क्षेत्रात 24 तास काम सुरू आहे. 425 कर्मचार्‍यांसह 23 अत्याधुनिक मशिनरी ठेवण्यात आल्या आहेत. आ. पाटील यांनी बुधवारी योजनेच्या कामाची पाहणी करून सूचना दिल्या.

धरण क्षेत्रात इंटेक वेल बांधण्यात आले आहे. तेथून इन्स्पेक्शन वेल 1 पर्यंत 72 मीटर पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. त्याची उंची सुमारे तीन मीटर उंच आहे. इन्स्पेक्शन वेल 2 चे 89 मीटर लांबीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जॅकवेल क्र. 2 चा स्लॅब पूर्ण झाला असून जॅकवेल क्र. 1 चा स्लॅब जोडण्याचे काम सुरू आहे. दोन्ही जॅकवेलवर पंप हाऊस बांधण्यात येत आहे. 940 एच. पी. चे 4 पंप असून तीन पंप 24 तास सुरू राहतील. एक पंप स्टँडबायसाठी ठेवण्यात येणार आहे. 15 लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचे (ब—ेक प्रेशर टँक) काम पूर्ण झाले आहे. 53 किलोमीटर लांबीची 1 हजार 800 मी. मी. व्यासाची जलवाहिनी असून त्यापैकी फक्त 47 मीटर काम शिल्लक आहे. बिद्री ते काळम्मावाडीदरम्यानच्या 23 कि. मी. विद्युत वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. 72 व्हॉल्व्हबरोबरच स्काडा यंत्रणेचेही काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती आ. पाटील यांनी दिली. यावेळी जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, क. अभियंता हेमंत जाधव, जे. के. पाटील, काळम्मावाडीचे सरपंच संदीप डवर, वैभव तहसीलदार उपस्थित होते.

2045 ची लोकसंख्या गृहित धरून योजना

कोल्हापूर शहराची 2045 मधील संभाव्य लोकसंख्या 10 लाख 29 हजार इतकी गृहित धरण्यात आली आहे. त्यानुसार दैनंदिन 238 एम. एल. डी. इतकी पाण्याची गरज भासणार आहे. ही गरज ओळखून थेट पाईपलाईन योजना आखण्यात आली आहे. काळम्मावाडी धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 2.3 टी. एम. सी. (76.85 दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा कोल्हापूर शहरासाठी राखीव ठेवला आहे. सद्यस्थितीत दररोज 180 एम. एल. डी. पाण्याचा उपसा केला जाणार आहे. 2040 नंतर गरजेनुसार पाणीपुरवठ्यासाठी धरण क्षेत्रात आणखी पंप वाढविण्यात येणार आहेत, असेही आ. पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news