‘भोगावती’ निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला

‘भोगावती’ निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला

कौलव, पुढारी वृत्तसेवा : शाहूनगर, परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. बुधवारी कारखान्याची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राधानगरी व करवीर या दोन तालुक्यांतील 58 गावांतील 27 हजार 558 सभासद आहेत.

कोव्हिड महामारीमुळे राज्यातील अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या होत्या. त्यामध्ये भोगावती साखर कारखान्याचाही समावेश होता. ही निवडणूक कधी होणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते; मात्र कारखान्याची कच्ची मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे निवडणूक होण्याचा मार्ग रिकामा झाला आहे.

2017 मध्ये कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने तब्बल साडेपाच हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने एकतर्फी सत्ता मिळवली होती. गटवार निवडणूक होणार असून दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी तीन गट केलेले आहेत.

राधानगरी तालुक्यात 14 हजार 254, तर करवीर तालुक्यात 12 हजार 809 सभासद आहेत. गटनिहाय सभासद संख्या ः कौलव-4371, राशिवडे बुद्रुक- 5742, कसबा तारळे- 4141, कुरुकली-5051, सडोली खालसा- 5315, हसूर दुमाला- 2443. कारखान्याचे दोन व्यक्तिगत सभासद असून 493 संस्था सभासद आहेत. कारखान्याच्या मुख्य कार्यालयात कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार कच्च्या यादीवर दि. 19 मे पर्यंत हरकती घेता येणार आहेत. त्यावर दि. 29 मे पर्यंत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यानंतर पक्की यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news