सैनिकांनी गाडी थांबवली अन्…! सुदानमधून परतलेल्या पाडळीतील कामगाराने कथन केला अनुभव | पुढारी

सैनिकांनी गाडी थांबवली अन्...! सुदानमधून परतलेल्या पाडळीतील कामगाराने कथन केला अनुभव

कासारवाडी, पुढारी वृत्तसेवा : सुदानमधील केनान शुगर फॅक्टरी ते सुदान पोर्ट अशा बाराशे कि.मी. अंतरामध्ये रात्रीचा बसने प्रवास करताना सुमारे 600 कि.मी. अंतरावर पोहोचल्यानंतर अचानक शस्त्रधारी सैनिकांनी बस थांबवली व ते बसमध्ये चढले. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रत्यक्ष शस्त्रधारी सैनिक पाहून घामच फुटला. त्यांनी सर्वांवर एक नजर टाकत ड्रायव्हरशी बोलणी केली, कागदपत्रे पाहिली आणि पाठीमागे जाण्यास सांगितले. पाडळी (ता. हातकणंगले) येथील मारुती राऊत यांनी आलेला अनुभव कथन केला.

सुरुवातीस सैनिकांपुरती मर्यादित असणारे युद्ध 15 एप्रिलनंतर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. परिसरातील गोळीबाराच्या घटना कानावर येत होत्या. यातच फॅक्टरी बंद झाली. तेथील निमलष्करी दलाने 13 हॉस्पिटलवर हल्ला केला. तसेच बायोकेमिकल लॅब ताब्यात घेतल्याचे समजले आणि भीतीची लहर पसरली. यानंतर विविध राज्यांतून आलेल्या सर्व भारतीय एकत्र येत आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधींशी संपर्क करू लागले. यामध्ये प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघातील लोकसभेतील खासदारांची संपर्क करू लागले. मी खासदार धैर्यशील माने यांच्याशी संपर्क केला. येथील परिस्थितीची व्यक्त करून सोडवण्यासाठी मागणी केली. यामुळे भारतीय राजदूत्वास संपर्कसाधून सरकार व कंपनीवर दबाव टाकला. सुदानमधील नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन कावेरी सुरू केल्याचे समजले.यांतर्गत भारतात येण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले. सुदान पोर्टपर्यंत बसेस पाठवल्या शेवटच्या बसने आम्ही निघालो. रात्रीचा प्रवास करत सुमारे 600 कि.मी. अंतरावर पोहोचल्यानंतर शस्त्रधारी सैनिक बसमध्ये चढले. त्यांनी ड्रायव्हरशी बोलणी केली, कागदपत्रे पाहून मागे जाण्यास सांगितले. तेथून ड्रायव्हरने पाठीमागे गाडी घेतली.

वायुसेनेचे जवान पाहून धीर आला !

सुमारे वीस किलोमीटर अंतर मागे गेल्यावर गाडी थांबवून एका मशिदीत थांबलो. सुमारे तीन तासांनंतर पुन्हा प्रवास सुरू झाला आणि कसेबसे सुदान पोर्टवर पोहोचलो. येथे भारतीय वायुसेनेचे जवान पाहून सर्वांच्याच मनात धीर आला . सुटकेचा श्वास घेत तेथून अहमदाबादमध्ये आलो आणि तिथून पुण्यामार्गे कोल्हापूरला दाखल झालो.

Back to top button