बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांचे कोल्हापुरात चिरंतन स्मारक झाल्यास नव्या पिढीस प्रेरणादायी ठरेल : डॉ. प्रतापसिंह जाधव

बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांचे कोल्हापुरात चिरंतन स्मारक झाल्यास नव्या पिढीस प्रेरणादायी ठरेल : डॉ. प्रतापसिंह जाधव
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भारतास 1947 ला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी केवळ 12 टक्के लोक सुशिक्षित होते तर आता 70 टक्के लोक सुशिक्षित आहेत; पण तरीही लोकसंख्येमुळे 42 कोटी लोक अशिक्षित आहेत. कोठारी कमिशनच्या शिफारसीप्रमाणे एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6 टक्के खर्च शिक्षणावर करणे आवश्यक आहे. भारत लोकसंख्येत जगात एक नंबर बनला आहे. या द़ृष्टीने देशाला प्रचंड काम करावे लागणार आहे. ज्ञान ही संपत्ती असून सर्वांचा पाया आहे. बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षण व समाजासाठी वाहिले. ते प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले. त्यांच्या विचारांचे कोल्हापुरात चिरंतन स्मारक झाल्यास ते नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी काढले.

जागर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले लिखित बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या जीवनावरील संशोधनात्मक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक डॉ. संजयसिंह चव्हाण प्रमुख उपस्थित होेते.

डॉ. जाधव म्हणाले, बॅ. खर्डेकर कोल्हापुरातील पहिले बॅरिस्टर आणि विनम्र, मृदूभाषी व्यक्तिमत्त्व होते. देशातील महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा देऊन सुमारे 250 हून अधिक शिक्षण संस्था काढल्या. 1952 ला ते कोल्हापूरचे निवडून आलेले पहिले खासदार होत. ते राज्यघटना समितीत होते. त्यांची संसदेतील व्याख्याने छाप पाडणारी होती, असेही डॉ. जाधव म्हणाले.

बॅ. खर्डेकर यांनी शिक्षणाचा दर्जा वाढविला तसेच विद्यार्थ्यांचे संगोपन करून त्यांना मोठे केले. शिक्षणात मोठे त्यागपूर्ण योगदान दिले. जहागीरदार असले तरी मनाची श्रीमंती त्यांच्याकडे होती. राज्य शिक्षण प्रसारक मंडळाने राज्य घडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्यावर पुस्तिका छापण्यात यावी. त्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबाची नव्हे तर समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांनी काढलेल्या काही शिक्षण संस्थांना बॅ. खर्डेकर यांचे नाव द्यावे, असेही डॉ. जाधव म्हणाले.

भारताला सांस्कृतिकबरोबर मोठा शैक्षणिक वारसा लाभला आहे, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले, युरोपात विद्यापीठे नव्हती तेव्हा भारतात नालंदा, तक्षशिलासारखी विद्यापीठे ज्ञानार्जनाचे काम करीत होती. भारताचा अनमोल ठेवा मुस्लिम आक्रमण व ब्रिटिशांनी लुटून नेला. इंग्रजांची आपल्यावर छाप पडल्याने भारतीय त्यांचे अनुकरण करीत आहेत. देशातील शैक्षणिक परंपरेचा सार्थ अभिमान असला पाहिजे. आज विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रसार होत असून माहितीचा विस्फोट झाला आहे. जगातील सर्व ज्ञान गुगलच्या माध्यमातून मिळत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ हे भारतीय आहेत. बॅ. खर्डेकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याची आज नितांत आवश्यकता आहे.

आ. प्रकाश आवाडे म्हणाले, कोल्हापूरच्या छोट्या गावातून जिद्दीने स्वातंत्र्यपूर्वकाळात बॅ. खर्डेकर यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या जीवनातील विविध पैलू आजही अप्रकाशित आहेत, त्याचा ऊहापोह झाला पाहिजे.

प्रास्ताविक प्रा. बी. जी. मांगले यांनी केले. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले. यावेळी विक्रमसिंह खर्डेकर, चंद्रसेन खर्डेकर, संग्रामसिंह खर्डेकर, पल्लवी शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news