राज्यातील धरणांत 36 टक्के पाणीसाठा! | पुढारी

राज्यातील धरणांत 36 टक्के पाणीसाठा!

कोल्हापूर; सुनील कदम :  पावसाळा सुरू व्हायला अजून महिनाभराचा अवकाश आहे; मात्र अद्यापही राज्यातील धरणांमध्ये जवळपास 36 टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ 28.83 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात या भागातील शेतीसह उद्योग-व्यवसायांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात सध्या 139 मोठ्या, 259 मध्यम आणि 2605 लहान अशा एकूण 3003 धरणांमध्ये मिळून एकूण 22350.14 दशलक्ष घनमीटर (789 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण 36.64 टक्के इतके आहे. गेल्यावर्षी याच तारखेला हा पाणीसाठा 37.39 टक्के होता. यावरून यंदा पाणीसाठा काहीसा कमी असल्याचे स्पष्ट होते.

राज्यात सर्वाधिक पाणीसाठा यंदा अमरावती विभागात असल्याचे दिसून येते. औरंगाबाद विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 41.75 टक्के आहे. कोकण विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 40.92 टक्के आहे. नागपूर विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 41.63 टक्के आहे. नाशिक विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 39.58 टक्के आहे. पुणे विभागात धरणांची संख्या जादा असली तरी पाणीसाठ्याची टक्केवारी कमी दिसून येत आहे. पुणे विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण 720 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 7527.85 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.

धरणांमधील पाणीसाठा आणि महापुराचा संबंध

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील महापुरावर राधानगरी, चांदोली आणि कोयना या तीन धरणांमधून होणार्‍या विसर्गाचा प्रभाव पडतो. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी या धरणांमधील पाणीसाठा केंद्रीय जल आयोगाच्या निकषाप्रमाणे केवळ 10 टक्केच असायला हवा, अशी सातत्याने मागणी होत असते. सध्या राधानगरी धरणात 33 टक्के, चांदोलीत 39 टक्के आणि कोयनेत 30 टक्के पाणीसाठी आहे; मात्र सध्याचा कडक उन्हाळा, पाण्याची वाढती मागणी आणि पाऊस लांबण्याची शक्यता या बाबी विचारात घेतल्या तर पावसाळ्यापूर्वी ही तीनही धरणे बर्‍यापैकी तळाला गेलेली दिसतील. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या तीनही धरणांमध्ये निकषांप्रमाणेच पाणीसाठा असेल, असा विश्वास जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे.

Back to top button