

कोल्हापूर, सुनील कदम : सध्या जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेचा चांगलाच बोलबाला सुरू आहे. काही क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापरही सुरू झाला आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी समूहाच्या द़ृष्टीने विनाशकारी ठरण्याचा इशारा अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने एका अहवालाद्वारे दिला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील काही तज्ज्ञांनीही तसाच इशारा देऊन याबाबतीत सध्या सुरू असलेले प्रयोग आहे त्या स्थितीत तातडीने थांबविण्याचे आवाहन केले आहे.
'स्पेस एक्स'चे प्रमुख अॅलन मस्क यांनीही हे प्रयोग तूर्त थांबवावेत, असे आवाहन केले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील 327 विशेषज्ञांची मते आजमावून आपला हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगातील मानवी समूहासमोर फार मोठा आण्विक धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबतीत सध्या जगभर सुरू असलेले प्रयोग रोखले नाहीत, तर संपूर्ण जगापुढेच अस्तित्वाचे संकट निर्माण होऊ शकते. काही वर्षांपूर्वी असे तंत्रज्ञान म्हणजे एक कल्पनाच होती; पण आता या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कोणत्याही समस्येचे उत्तर शोधले जाऊ शकते; पण त्यामध्ये तेवढेच धोकेही दडले असल्याकडे या अहवालाने लक्ष वेधले आहे.
हे तंत्रज्ञान काहीवेळा वापरकर्त्यास भ्रमित करण्याचा धोका आहे. तसेच या तंत्रज्ञानाचा वापर करून काही बाबतीत पक्षपात करणेही शक्य आहे. सर्वात मोठा धोका म्हणजे, जगभरातील दहशतवादी संघटना या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ठिकठिकाणी दहशतवादी कारवाया घडवून आणू शकतात. तसे झाल्यास जगभरात अनेक समस्या नव्याने निर्माण होण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आलेली आहे.
हा अहवाल तयार करण्यासाठी ज्या 327 विशेषज्ञांची मते आजमावण्यात आली, त्यापैकी एक तृतीयांश विशेषज्ञांनी या तंत्रज्ञानामुळे मानवी समूहाला धोका असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. काही विशेषज्ञांनी या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतरच्या अल्पावधीतच मानवी विनाश अटळ असल्याचा धोका दर्शवून दिला आहे. जवळपास 35 टक्के विशेषज्ञांनी मात्र या तंत्रज्ञानाचा मानवी जीवनातील प्रत्यक्ष वापर क्रांतिकारक ठरेल, असा आशावाद व्यक्त केला आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात काही आमूलाग्र बदल होतील, असे त्यांना वाटते.
सध्या या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर हा अमेरिकेत होतो; पण 35 टक्के अमेरिकन नागरिकांनी या तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर देशविघातक कारवायांसाठी होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील फ्युचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूट या संस्थेने जगभरातील सर्व देशांना एक खुले पत्र पाठवून या तंत्रज्ञानाचे सध्या सुरू असलेले सगळे प्रयोग तातडीने बंद करा, असे आवाहन केले आहे.
एकूणच कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी जीवनात प्रत्यक्षातील वापराच्या सुरुवातीलाच त्याबाबतचे वादविवाद पुढे येऊ लागले आहेत. जगभरात या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत काय एकमत होते किंवा वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे मत होते, यावरच या तंत्रज्ञानाचे भवितव्य आणि त्याचा प्रत्यक्षातील वापर अवलंबून आहे.
'एआय'चा विकास 6 महिने नको : अॅलन मस्क
आजकाल जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राची व्याप्ती वेगाने वाढत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसत आहे. मात्र, त्याचे काही धोकेही समोर येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने अनेक नोकर्यांवर गदा आणली आहे. काही लोक याला 'मानवासाठी धोका' मानत आहेत. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या अॅलन मस्क यांच्यासह अनेक दिग्गजांना हा धोका जाणवला आहे. या सर्वांनी एक पत्र लिहून 'एआय'शी संबंधित नवीन प्रकल्पांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मस्क यांनी याआधीही 'एआय'बद्दल अनेकदा इशारे दिलेले आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, काही काळानंतर 'एआय' मानवावर वर्चस्व गाजवू शकते. या खुल्या पत्रात म्हटले आहे की, 'एआय' प्रणाली समाज आणि मानवतेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. किमान 6 महिन्यांसाठी प्रणालीचा विकास त्वरित थांबवावा.