कोल्हापूर : जिल्ह्यातील 450 लोकांना 22 लाखांचा गंडा | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यातील 450 लोकांना 22 लाखांचा गंडा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  सामाजिक संस्थेच्या नावाने 4 हजार 500 रुपयांची ठेव ठेवा आणि 25 लाख रुपये मिळवा, असे आमिष दाखवून शहरासह जिल्ह्यातील 450 लोकांना सुमारे 22 लाख 37 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी पूजा अजित भोसले (रा. सिल्व्हर आर्च अपार्टमेंट, राजारामपुरी), राहुल रमेश भोसले (रा. पूजा प्रिया पार्क, उचगाव), भरत गाठ (रा. शरद इंडस्ट्रीजजवळ, यड्राव) या तिघांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन लालासो देसाई (वय 48, रा. तक्षक अपार्टमेंट, नागाळा पार्क) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

सचिन देसाई हे इंजिनिअर आहेत. कामानिमित्त त्यांची ओळख राहुल भोसले यांच्याशी झाली. त्यांनी निवारा या ट्रस्टकडून अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. ते लोकांना मदत करतात, अशी माहिती देत या ट्रस्टकडे 4 हजार 500 रुपये ठेव ठेवल्यास त्या मोबदल्यात 25 लाख रुपये मिळतात, असे आमिष देसाई यांना दाखविले. देसाई यांनी स्वतःचे 4 हजार 500 रुपये भरलेच; परंतु नातेवाईक आणि ओळखीच्या 12 लोकांचे 54 हजार रुपये ‘गुगल पे’च्या माध्यमातून राहुल भोसले यांच्याकडे पाठविले. त्यानंतर काही दिवसांनी परत 32 लोकांचे 1 लाख 44 हजार रुपये राहुल भोसले यांना पाठविले. त्यानंतर सचिन देसाई यांच्या ओळखीच्या नामदेव जाधव, आनंद मुनवळी यांनीही राहुल भोसले यांची भेट घेऊन ओळखीच्या लोकांचे पैसे भरायला सुरुवात केली.

गुंतवणुकीची साखळी वाढली

4 हजार 500 रुपयांपैकी 3 हजार 900 रुपये ट्रस्टकडे जमा होतात व उर्वरित 600 रुपये ऑफिस खर्च आहे. तसेच 25 लाखांच्या ठेवीची जबाबदारी कंपनीच्या मुख्याधिकारी पूजा भोसले यांनी मला दिल्याचेही राहुल भोसले यांनी नामदेव जाधव यांना सांगितले. त्यानंतर जाधव यांनीही यावर विश्वास ठेवत आणखी 100 लोकांचे साडेचार लाख रुपये राहुल भोसले यांच्याकडे जमा केले. मात्र, त्याची ठेव पावती देण्यास राहुल भोसले टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे सचिन देसाई व नामदेव जाधव यांनी राजारामपुरी येथे जाऊन सीईओ पूजा भोसले यांची भेट घेतली. त्यावेळी भोसले यांनी ठेवीचे पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. तसेच दुसर्‍या दिवशी त्रिवेणी हॉटेलशेजारी निवारा संस्थेच्या ऑफिसमध्ये येऊन भेटा, असेही त्यांना सांगण्यात आले.

उसने पैसे घेतले

त्यानुसार सचिन देसाई व नामदेव जाधव संस्थेच्या ऑफिसमध्ये गेले. तेथे पूजा भोसले यांनी भरत गाठ यांच्याशी त्यांचा परिचय करून दिला. पूजा भोसले व गाठ यांनी सचिन देसाई व नामदेव जाधव यांना संस्थेच्या व्यवहाराची पासबुके दाखवून पुन्हा त्यांचा विश्वास संपादन केला. तुम्ही भरलेल्या पैशांप्रमाणे राहुल भोसले याला एफडी द्यायला लावू. मात्र, यापुढे थेट आमच्या खात्यावर पैसे भरा, असे सांगितले. त्यानुसार सचिन देसाई यांनी त्यांच्या ओळखीच्या आणखीन 134 लोकांचे 5 लाख 22 हजार रुपये जमा केले. भरत गाठ यांच्याकडेही 48 हजार 600 रुपये जमा करण्यात आले; तर नामदेव जाधव यांनी त्यांच्या ओळखीच्या आणखी 170 लोकांचे 6 लाख 63 हजार रुपये जमा केले. दरम्यानच्या काळात पूजा भोसले यांनी सचिन देसाई यांच्याकडून 2 लाख 65 हजार रुपये उसने घेतले.

 एफडी देण्यास टाळाटाळ

सचिन देसाई व नामदेव जाधव यांनी पैसे भरलेल्या लोकांच्या 25 लाखांच्या एफडीची मागणी वारंवार केली; पण राहुल भोसले, पूजा भोसले व भरत गाठ या तिघांनीही काही तरी कारणे सांगून एफडी देण्याचे टाळले. अखेर फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्याने सचिन देसाई यांनी शाहूपुरी पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली आहे. या प्रकरणात 450 लोकांची फसवणूक झाली आहे.

Back to top button