

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : देशातील पहिला सार्वजनिक व खासगी क्षेत्राच्या भागिदारीतून आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये संदेश देवाणघेवाण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने बिनतारी संदेश यंत्रणेचा (हॅम रेडिओ) पहिला पथदर्शी प्रकल्प कोल्हापुरात सोमवारी कार्यान्वित झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रेडिओ मॅच्युअर क्लब कोल्हापूर, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांचे कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी आणि आयईईई संस्था, अमेरिका यांच्या भागिदारीतून सुरू केलेल्या या प्रकल्पाचे जिल्हा नियंत्रण कक्षात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर इतर सर्व संदेश देवाणघेवाण यंत्रणा बंद होतात. अशा वेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये संदेश देवाणघेवाण करण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. या यंत्रणेचा वापर करणार्या हौशी संघटनेच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील सदस्यांकडून कोल्हापूर जिल्हा आणि करवीर तालुक्यातील आंबेवाडी व चिखली ही गावे हॅम रेडियो तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडण्याचे काम या प्रकल्पांतर्गत केले आहे. जिल्ह्यात पूरबाधित भागाशी संदेश देवाणघेवाण सातत्याने करता येणार आहे. लोकांचे स्थलांतरावेळी काही लोक अडकले असतील तर त्यांची सुटका शोध व बचाव इत्यादी सर्व कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी प्रकल्पाची माहिती दिली. यानंतर या यंत्रणेचा वापर करून या दोन गावांमध्ये संदेश देवाणघेवाण करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, मालोजीराजे, नितीन ऐनापुरे, व्ही. बी. पाटील, प्राचार्य पी. बी. माने आदी उपस्थित होते.
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांचे कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. सारिका पनवर व डॉ. राकेश धुमाळे यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. जिल्ह्यातील हॅम रेडिओ मेंबर नितीन ऐनापुरे यांच्या विशेष प्रयत्नांनी जिल्ह्यासाठी हा प्रकल्प साकारता आला. या प्रकल्पाचे केअरटेकर म्हणून यापुढे ऐनापुरे काम करणार आहेत. या सर्वांना मालोजीराजे यांनी शुभेच्छा दिल्या.