

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वाहन खरेदीच्या आर्थिक देव-घेवीतून पांडुरंग शंकर गायकवाड (वय 50, रा. केर्ली, ता. करवीर) या बांधकाम व्यावसायिकावर चाकूने हल्ला करण्यात आला. दोन ते तीन हल्लेखोरांनी गायकवाड यांची कार अडवून त्यांच्या कारवर मोठे दगड घालत कारचा अक्षरशः चक्काचूर केला. हा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास गजबजलेल्या शाहूपुरीत घडला. अचानक मारामारी आणि चाकूहल्ला झाल्याने परिसरात घबराट पसरली.
पांडुरंग गायकवाड हे मंगळवारी दुपारी कामानिमित्त शाहूपुरीत आले होते. करवीर बेकरीसमोर दोन ते तीन हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली. त्यांनी गायकवाड यांच्याशी वाद घातला. त्यानंतर एकाने गायकवाड यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रसंगावधान राखून गायकवाड बाजूला सरकल्याने छातीवर होणारा वार उजव्या दंडावर बसला. याचवेळी इतर हल्लेखोरांनी दगडफेक करून कारच्या काचा फोडल्या. गर्दी जमताच हल्लेखोर पळून गेले. जखमी गायकवाड यांना सीपीआरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
शाहूपुरी पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून हल्ल्याची माहिती घेतली. हल्लेखोर कदमवाडी येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी पांडुरंग गायकवाड यांच्याकडून कार खरेदी केली होती. ही कार चोरीची असल्याने ती पोलिसांनी जप्त केली. त्यामुळे संशयित हल्लेखोरांनी गायकवाड यांच्याकडे दिलेल्या पैशांची मागणी केली. गायकवाड यांनी मला पैसे मिळाले की, तुम्हाला देतो, असे सांगून टाळाटाळ सुरू केली होती. त्यामुळे संतापलेल्या संशयितांनी हा हल्ला चढविल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी अभिजित गरड याच्यासह त्याच्यासोबत असणार्या दोन तरुणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.