कोल्हापूर : हेरवाड येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू; दफन केलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन | पुढारी

कोल्हापूर : हेरवाड येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू; दफन केलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : हेरवाड (ता. शिरोळ) येथील अमीर बालेचंद नदाफ (वय 30) या युवकाचा सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथे संशयास्पद मृत्यू झाला. याची तक्रार अमीरची पत्नी फातिमा अमीर नदाफ, भाऊ अकबर बालेचांद नदाफ यांनी कवठेमहाकाळ पोलिसांत दिली. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात आज (दि.२) कबर खुदाई करून अमीरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी आज दुपारी चार वाजता कवठेमहांकाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोरे, अब्दुललाटच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासह हेरवाड येथील कब्रस्तानमध्ये दाखल झाले.

दरम्यान, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यू की घातपात हे स्पष्ट होणार आहे. अमीर नदाफ याचे सहा महिन्यापूर्वी पत्नी फातिमा नदाफ याच्याशी वाद झाल्याने ती माहेरी इचलकरंजीला निघून गेली होती. याच घरगुती तणावातून अमीर नदाफ हा कोगनोळी येथील आपल्या आत्तीकडे 6 महिन्यापासून राहत होता. शनिवारी रात्री अमीर नदाफ याचा हृदयविकाराचा धक्क्याने मृत्यू झाल्याचे अत्तेभाऊ सलीम दाऊद नदाफ (रा. कोगनोळी) याने सांगितले. शनिवारी रात्री एक वाजता सुमारास अमीर याचा मृतदेह हेरवाड येथे त्याच्या मूळ गावी आणण्यात आला. रविवारी सकाळी मृत देहाचा दफनविधी करण्यात आला.

दरम्यान, अमीर नदाफ आणि सलीम नदाफ यांच्यामध्ये शनिवारी सायंकाळी कोणत्यातरी कारणाने वादावादी झाली होती. त्यानेच मारहाण केल्याने अमीरचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करत भाऊ अकबर नदाफ आणि पत्नी फातिमा नदाफ यांनी अमीर याचा मृत्यू संशयास्पद आहे. याबाबत अकबर नदाफ याच्याविरुद्ध तक्रार दिली होती.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने कवठेमहांकाळचे सहायक पोलीस निरीक्षक गोरे यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्याशी संपर्क साधला. तसेच हेरवाड येथे दफन केलेला अमीर याचा मृतदेह पुन्हा खुदाई करून काढून शवविच्छेदन करण्यासाठी पत्र दिले. त्यानंतर अब्दुललाट आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पथक हेरवाड येथील कबरस्थानमध्ये दाखल झाले. खुदाई करून मृतदेह बाहेर काढून मृतदेहाचे सध्या शवविच्छेदन सुरू आहे. या प्रकरणामुळे हेरवाड गावात तणावपूर्ण वातावरण बनले आहे.

हेही वाचा 

Back to top button