कोल्हापूर : शिवनिर्मित पावनगड मोहिमेदरम्यान ऐतिहासिक गुहेचा शोध | पुढारी

कोल्हापूर : शिवनिर्मित पावनगड मोहिमेदरम्यान ऐतिहासिक गुहेचा शोध

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवनिर्मित पावनगड किल्ल्यावर इतिहास संशोधक आणि शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी प्रती शनिवार, रविवार असे गेली ४ महिने स्वच्छ्ता मोहीम आयोजीत केली होती. पावनगड किल्ल्यांविषयी स्वच्छ्ता करताना इतिहास संशोधक राम यादव, मोडी व इतिहास संशोधक अमित आडसुळे, रविराज कदम यांनी स्थानिक पावनगड रहिवासी मुजावर यांच्या सोबत ऐतिहासिक संदर्भ साधनात आढळणाऱ्या पावनगडच्या आसमंतातील गुहांचे संदर्भ निदर्शनास आणून दिले. तसेच या भागात अशा प्रकारच्या गुहा आहेत का? याविषयी विचारणा केली. यावेळी ७० वर्षांचे दिलावर मुजावर (बाशू)आणि त्यांचे बंधू आयुब मुजावर यांनी पूर्वी गडपायथ्याच्या जंगलात लाकूडफाटा गोळा करताना एक गुहा तटाच्या खालच्या खोबणीत पाहिल्याचे आठवते असे सांगितले.

शिवकालीन इतिहासाच्या दृष्टीने अशा प्रकारच्या गुहांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन वरील इतिहास अभ्यासक मंडळींनी मुजावर यांना सोबत घेऊन या गुहेची शोध मोहीम सुरू केली. गडपायथ्याच्या जंगलातील तटाखाली शोध मोहिमे नंतर सदर गुहा शोधण्यात कार्यकर्त्यांना यश आले. लागलीच प्रत्येक स्वच्छ्ता मोहिमेला असणाऱ्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांना बोलावून या गुहेची स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली. दिवसभराच्या परिश्रमाने शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी गुहेच्या परिसराची स्वच्छता करून गुहा नव्याने सर्वांसाठी खुली केली. या गुहेचा अभ्यास करता हे लक्षात येते की पूर्वी ही गुहा मानव निर्मित आहे. कारण या ठिकाणी दिवा लावण्यासाठी केलेल्या दिवळी आणि इतर खुणा आढळतात पण कालांतराने ही गुहा जनावरांच्या वास्त्यव्यासाठी उपयोगात आली आहे. या प्रकारच्या खुणा गुहेत आढळतात. मुळात ४० ते ५० फूट आत पर्यंत लांब असणारी आणि तेवढीच रुंद असणारी ही गुहा जनावरांनी खोदून आणखी आत पर्यत खोल केली आहे तशा प्रकारचे खोलवर खोदलेले निदर्शनास येते.

या मोहिमेत इतिहास संशोधक राम यादव, मोडी व इतिहास संशोधक अमित आडसुळे,रविराज कदम, हर्षल सुर्वे,गणेश खोडके,दिगंबर भोसले,सुनील सुतार,धनंजय जाधव,विशाल खांडेकर,प्रदीप हांडे,रोहित पाटील,अनिकेत माधव,सौरभ चव्हाण, रवींद्र आमने.

Back to top button