कोल्‍हापूर : खेरीवडे फाट्याजवळ पिकअपची एसटी बसला धडक; ७ जण जखमी | पुढारी

कोल्‍हापूर : खेरीवडे फाट्याजवळ पिकअपची एसटी बसला धडक; ७ जण जखमी

कळे : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खेरीवडे (ता.पन्हाळा) फाट्याजवळ महिंद्रा बोलेरो पिकअपने चुकीच्या दिशेने येवून एसटीला समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये सातजण जखमी झाले. हा अपघात काल (सोमवार) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास झाला. याची नोंद कळे पोलीस ठाण्यात झाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, एसटी चालक शशिकांत भगवान कांबळे (वय ३९,रा.वाकरे ता.करवीर) हे एसटी बस (क्र.एम एच १४ बीटी ३४०५) मधून प्रवासी घेवून गगनबावड्याकडे निघाले होते. याचवेळी कोकणातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपचा (क्र. एमएच ४३ बीएक्स ९७७२) चालक तात्यासो आनंदा पवार (वय ३८ रा. नाडे ता.पाटण,जि.सातारा) याने वेगामध्ये चुकीच्या दिशेने येवून एसटीला समोरुन जोराची धडक दिली. यामध्ये एसटीचे चाक तुटून टायर फुटला व केबीनचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

धडक इतक्‍या जोराची होती की, बोलेरो पिकअपच्या केबीनचाही चक्काचूर होवून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जखमी झालेल्या पिकअप चालकाला उपचारासाठी नागरिकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेने सीपीआरला पाठवले. एसटी बसमधील चालक शशिकांत भगवान कांबळे (रा.वाकरे ता.करवीर), वाहक वनिता अमर पाटील (रा.पोहाळे तर्फ बोरगाव ता.पन्हाळा), प्रवासी पांडुरंग तुकाराम पाटील (रा.तळये बु.ता.गगनबावडा), उमेश बाळकृष्ण सावंत (रा. तिसंगी ता.गगनबावडा), निखिल शिवाजी पडवळ (रा.खोकुर्ले पैकी पडवळवाडी ता.गगनबावडा), संदीप शिवाजी बुवा (रा.चव्हाणवाडी ता.पन्हाळा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button