ई-बुक्स वाचनाकडे कल वाढला! आवडीची पुस्तके डाऊनलोड करण्यावर भर | पुढारी

ई-बुक्स वाचनाकडे कल वाढला! आवडीची पुस्तके डाऊनलोड करण्यावर भर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :

पुस्तक हाती धरून वाचनाचा आनंद निराळा असतो. असे असले, तरी कोरोनामुळे वाचनाचा ट्रेंड बदलला आहे. विद्यार्थी, वाचकांचा ई-बुक्स वाचनाकडे कल वाढला असून आवडीची पुस्तके डाऊनलोड करून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. येणार्‍या काळात हा ट्रेंड अधिकच रुजणार असल्याचे सोशल मीडिया तज्ज्ञांचे मत आहे.

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस दरवर्षी (15 ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जिल्ह्याची वाचन संस्कृती असते. त्यात अनेक उपप्रवाह असतात. वेगवेगळ्या कालखंडात वाचन संस्कृती रुजत गेली आहे. कोरोना काळात वाचन संस्कृती व अभिरुची बदलली आहे. मोजक्या शब्दांत मांडणीला समाजमाध्यमांवर महत्त्व आले. याकडे मोठा वाचक वर्ग वळला आहे. वॉटस् अ‍ॅप, फेसबुक, यू-ट्यूबच्या माध्यमातून भाषणे, शब्दांकन, मुलाखती, मनोगत अपलोड करून त्यास लाईक मिळवित आहेत.

इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील साहित्य सहज उपलब्ध झाले आहे. गाजलेले पुस्तक इंटरनेटवरून डाउनलोड करीत वाचन करणारे विद्यार्थी, वाचक वाढले आहेत. विविध नामांकित प्रकाशन संस्था, मराठी प्रकाशकांनी ई-बुक सुविधा सुरू केली आहे. हिंदी, इंग्रजी पुस्तके, मासिके व स्पर्धा परीक्षांची पुस्तके डाऊनलोड करण्याचे प्रमाण अधिक आहे. वेळ आणि पैशाची बचत असल्यामुळे अनेकांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. ई-बुक, अ‍ॅप्स तंत्रज्ञान वाचन संस्कृतीतील पुढचे पाऊल ठरणार आहे. असे असले, डिजीटल पायरसी वाढणे धोक्याचे ठरत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे समाजमाध्यम विश्लेषकांना वाटते.

कोरोनामुळे समाजमाध्यमांवर लोक व्यक्त होत आहेत. व्यक्त होण्यामागे इतरत्र आलेला भाग असतो. त्या माहितीचा पाठपुरावा करून खातरजमा केली जात नाही. अनेकांमध्ये असलेले कलागुण जगभर व्यक्त होण्यास नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. प्रत्यक्ष पुस्तकांबरोबर ऑनलाईन ई-बुक्स, किंडल, पॉड कॉस्ट माध्यमांचा वापर सुरू आहे.
दिनेश कुडचे, समाजमाध्यम विश्लेषक

Back to top button